गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंचाला ओळखले जाते. त्यामुळे सरपंचाचा गावात वेगळाच तोरा असतो. महिला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सक्षम असतानाही, अनेक पतीराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत असतात. पत्नीच्या आडून तेच कारभार करीत असतात. त्यामुळे राज्य शासनाने आता सरपंचाच्या पती व नातेवाइकाला कार्यालयातच येण्यास बंदी केली आहे. तसेच कामात हस्तक्षेप आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
कोट
महिला सरपंच म्हणतात.
मी या निर्णयाचे स्वागत करते. अनेक महिला सरपंचांमध्ये नेतृत्वगुण असूनही त्या महिला सरपंचांना केवळ समाजाचा आणि पतीचा मान राखण्यासाठी नाइलाजास्तव‘सहीबाई’ म्हणून काम करावे लागते. खरे तर हा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. पुरुषी संस्कृतीला चाप बसून अनेक महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असते.
- ॲड. शर्मिला रामटेके, सरपंच नवेगाव पांडव, ता. नागभीड
----
बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिलांना सरपंच होण्याचा मान मिळतो. त्यावेळी अपवादात्मक ग्रामपंचायतीमध्ये महिला पतीचा हस्तक्षेप असतो. परंतु, आज महिलाही ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असून त्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम होत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
- अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच, विसापूर