आक्सापूर : वनविकास महामंडळ वनपरिक्षेत्र झरण अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रामध्ये आक्सापूर येथील शेतकरी गुरूदास निलकंठ किरमे व अविनाश यादव बुरांडे यांच्या मालकीचे जनावरे जंगलात चरायला गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून ठार मारले होते. आता नुकसान भरपाईसाठी हे शेतकरी पायपटी करीत आहेत.या शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान भरपाईसाठी झरण येथील वनविकास महामंडळाच्या कार्यालयात अर्ज केला होता. चार महिन्यांपासून शेतकरी कार्यालयात पायपीट करीत आहे. नुकसान भरपाई तात्काळ देण्याचे शासनाचे आदेश असतानासुद्धा झरण येथील एमडीसीएम कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांना चार महिन्यापासून मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सदर शेतकरी झरण येथील कार्यालयात गेले असता बल्लारशाह येथील विभागीय कार्यालयामधून केस आलेली नाही, तुम्ही नंतर या. आठ दिवसांनी येईल. विभागीय कार्यालयामध्ये जावून भेटा, असे उडवाउडवीचे उत्तर देवून आल्यापावली परत पाठवित आहे. त्यामुळे एफडीसीएम विभागाप्रति शेतकऱ्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
नुकसान भरपाईसाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:55 AM