चंद्रपूर : दोन हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणली. त्यामुळे या नोटा बॅंकेत बदलविण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सावली तालुक्यातील सामदा व नवेगाव या ग्रामपंचायतींनी गृहकर, पाणीकर भरणाऱ्यांकडून दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
मार्च महिन्यात गृहकर व पाणी कर भरावा लागत असतो. याच पैशातून ग्रामपंचायत स्तरावरील काही विकासात्मक कामे करण्यात येत असतात. परंतु, ग्रामीण भागातील नागरिक अनेकदा गृहकर व पाणीकर भरण्याकडे कानाडोळा करतात. अशावेळी गृहकर व पाणीकराचा भरणा करण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपाययोजना करत असते.
नुकताच सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्याच्याजवळ दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत. ते त्या नोटा भरण्यासाठी बॅंकेत चकरा मारत आहेत. तर कधीकधी रांगेतही राहत आहेत. या पार्श्वभूमीवर सावली पंचायत समितींतर्गत येणाऱ्या सामदा व नवेगाव येथील ग्रामसेवक हर्षना बागडे यांनी गृहकर व पाणीकर भरणाऱ्यांकडून दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील, असे आवाहन केले आहे.
कर भरणाऱ्यांचा निघणार लकी ड्रा
सामदा ग्रामपंचायतीने कर भरणाऱ्यांसाठी लकी ड्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कर भरणाऱ्यांना या लकी ड्रामध्ये सहभागी होता येणार आहे. विजेत्याला अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. नागरिकांनी थकीत कर भरुन या लकी ड्रामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सामदा येथील ग्रामसेवक हर्षना बागडे यांनी केले आहे.
थकीत गृहकर व पाणीकर गोळा करण्याच्या अनुषंगाने हा पर्याय अवलंबिला आहे. ज्याच्याकडे गृहकर व पाणीकर थकीत आहे. त्याच्याकडून दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांनी वेळेत थकीत कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
- हर्षना बागडे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय सामदा व नवेगाव