बीआयटीमधील प्रकार : ऐन परीक्षेच्या काळात संपाचे हत्यारचंद्रपूर : बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या प्राध्यापकांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मागील सहा महिन्यांपासून वेतनच न झाल्याने हा मार्ग स्विकारावा लागला, असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.मागील १७ मार्चपासून महाविद्यालयात हे आंदोलन सुरू असल्याने या विद्याशाखा विभागातील सर्वच शैक्षणिक कामे ठप्प पडली आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परिक्षेचा हा काळ असल्याने त्याचा परिणाम या परिक्षेवर पडत आहे. असे असले तरी अद्याप व्यवस्थापनाने या संदर्भात कसलीही दखल घेतली नसल्याचा आरोप प्राध्यापकांच्या गटाने केला आहे. सिव्हील इंजिनिअरिंग शाखेच्या सेक्रेटरीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर-२०१६ पासून या प्राध्यापकांचे वेतन व्यवस्थापनाने अडविले आहेत. त्यामुळे आपले संसार चालवायचे तरी कसे, असा या प्राध्यापकांचा प्रश्न आहे. मागील सहा महिन्यापासून वेतन अदा न झाल्याची कल्पना संस्थाचालकांना आहे. या संदर्भात वारंवार विनंती करून आणि निवेदनेही संस्थाचालकांना देण्यात आली आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी पाच महिन्यानचे वेतन अडले असताना या प्राध्यापकांनी १५ दिवसांचा संप केला होता. यावेळी संपावर जाण्यापूर्वी एक दिवसांचा नोटीस देवून हे प्राध्यापक संपावर गेले आहेत. वेतनाच्या प्रश्नावर साफ दुर्लक्ष केल्याने कुटुंबाच्या पोषणासाठी नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागल्याचे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम शैक्षणिक कार्यावर पडल्याने ऐनवेळी अपात्र प्राध्यापकांंच्या नियमबाह्य नियुत्या करून काम ढकलण्याचा प्रकार संस्थेने केल्याचा प्राध्यापकांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांची कसल्याही स्वरूपाची प्रात्यक्षिक परीक्षा न घेता अथवा प्रोजेक्ट्स पूर्ण करून न घेता विद्यार्थ्यांना सरसकट गुण दिले जात आहेत. हा प्रकार नियमबाह्य असून विद्यापिठाच्या डोळ्यात धुळ झोकणारा असल्याने या गंभीर प्रकाराची दखल मुख्यमंत्र्यांनी घेण्याची विनंती या प्राध्यापकांनी निवेदनातून केली आहे. आपला संप योग्य कारणासाठी असला तरी तो दडपण्याचा संस्थाचालकांचा प्रयत्न असल्याचा आरोप या प्राध्यापकांनी केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)संपामुळे काम थांबलेले नाही, अन्य प्राध्यापकांकडून सुरु आहे. संबंधित प्राध्यापक नोटीस न देता कामावरून निघून गेले. शासनाचा निधी न मिळाल्याने वेतन देता आले नव्हते. मात्र आता निधीची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे लवकरच वेतन देता येईल. त्यांनीही परीक्षकाळात संपावर जायला नको होते.- अॅड.बाबासाहेब वासाडे, सचिव, बल्लारपूर इन्सिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी
सहा महिन्यांपासून वेतन अडले, प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 12:38 AM