बल्लारपूर (चंद्रपूर) : बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावरील वर्दळीचे ठिकाण असलेल्या रेल्वे चौकात एका सोळा चाकी ट्रकने पादचाऱ्याला चिरडले. यात त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहम्मद फारूक अब्दुल गफ्फार (७० वर्षे) रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट, असे मृतकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.
अब्दुल गफ्फार यांची मुलगी येथील टेकडी भागात राहते. ते मुलीच्या घरी आले होते. रविवारी रेल्वे चौकातून पायदळ रस्ता पार करीत असताना चंद्रपूरहून,आलापल्लीकडे जात असलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात ते ट्रकखाली येऊन चिरडले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक तिथेच सोडून पसार झाला. पोलिसांनी तो ट्रक पोलिस स्टेशनसमोर नेऊन उभा केला आहे. पोलिस निरीक्षक उमेश पाटील घटनास्थळी लगेच दाखल झाले.
रेल्वे चौक झाले अपघात प्रवण स्थळ
बल्लारपूर येथील रेल्वे चौक हे येथील सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असून चारही दिशांनी या चौकातून लहान-मोठे वाहन धावत असतात. या ठिकाणी यापूर्वीही वाहनांचे अपघात होऊन त्यात अनेकांचा बळी गेला आहे. या चौकात ट्रॅफिक सिग्नल लावणे गरजेचे आहे. लोकांची बऱ्याच वर्षांपासून तशी मागणी आहे. मात्र,याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दोन दुचाकीच्या धडकेत एक ठार : एक गंभीर
पोंभूर्णा : कोठारी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या केमारा देवई रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक गंभीर झाल्याची घटना रविवारी केमारा देवई मार्गावर घडली. मृतकाचे नाव अशोक लक्ष्मण वेलादी (४२) रा. देवई असे असून स्वप्नील नरेश शेंडे (२५) रा. कोठारी असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. कोठारी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या केमारा देवई रस्त्यावरील नाल्याजवळ समोरासमोर आलेल्या दोन दुचाकीची जबर धडक झाली. यात देवई येथील अशोक वेलादी याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर कोठारी येथील स्वप्नील शेंडे हा गंभीर जखमी असल्याने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र प्रकृती नाजूक असल्याने त्याला तात्काळ चंद्रपूरला रेफर करण्यात आले.
चारचाकीची दुचाकीला धडक; दोन गंभीर
सावली : तालुक्यातील खेडी येथील टी पाईंट येथे झालेल्या अपघातात दोन जण गंभीर झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. शुभम परशुराम गुरनुले (२५) व जयकुमार बाऊजी मोहुर्ले (४०) अशी जखमींची नावे आहेत. ते सावली शहरातील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी आपल्या दुचाकीने (क्र. एमएच ३४ बी.सी. ८२३०) ते मूल येथील काम आटोपून परत येत असताना सावलीकडून मूल मार्गाने परत जाताना भरधाव टाटा एसने (क्र. एमएच ४९ डी २०२२) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात शुभम व जयकुमार हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना लगेच ग्रामीण रुग्णालय सावली येथे भरती करण्यात आले; मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे.