गुड मॉर्निंग पथकाची मोहीम : भद्रावती शहर हागणदारीमुक्तीचा संकल्पभद्रावती : भद्रावती शहर येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत हागणदारीमुक्त करण्याच्या हेतूने न.प. भद्रावतीच्या गुडमॉर्निंग पथकाने धडक मोहीम हातात घेतली असून उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५५ जणांवर भद्रावती पालिकेने दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. शौचालयाचे अनुदान घेऊनही शौचालय बांधणाकाम न करणाऱ्या तसेच शौचालयबांधूनही उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे.न.प.चे गुडमॉर्निंग पथक अगदी पहाटेपासूनच विविध वॉर्डात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचा शोध घेत आहे. सदर व्यक्ती उघड्यावर शौचास बसल्याचे आढळताच त्याचा हार-तुरा, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात येतो. बँड वाजविण्यात येतो. वाजतगाजत त्याला गाडीमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात येते. पहिली वेळ असल्यास न.प.च्या वतीने २०० व त्यानंतर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. या धडक मोहिमेत बाहेर उघड्यावर शौचास बसलेल्या आजी-नातू, लहान मुलगा-आई यांचेवरही कारवाई करण्यात आल्याचे न.प.द्वारे कळविण्यात आले. यासोबतच न.प.द्वारे सोनल टॉकीजमागे सुमठाणा बेघर वस्तीजवळ, डोलारा तलाव, गवराळा, विंजासन, भंगाराम वॉर्ड परिसर या नऊ ठिकाणी एकूण ६० सिट्सचे सामुदायिक शौचालय २६ तारखेपर्यंत बांधून देण्यात येणार आहे. शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव तसेच पथकाचे पुरुष व महिला सदस्यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
उघड्यावर शौचास जाणाऱ्या ५५ जणांवर दंडात्मक कारवाई
By admin | Published: January 11, 2017 12:41 AM