मागणी : नागपूर हिवाळी अधिवेशनावर १४ डिसेंबरला मोर्चा गडचांदूर: नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना विविध विभागाने नियमित निवृत्ती वेतन योजना नाकारत अंशदायी पेंशन योजना लागू केल्याने संतापलेल्या राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी आता थेट सरकारच्या विरोधात पेंशन बचाव टेंशन हटावचा नारा पुकारला आहे. संपूर्ण राज्यभर विविध माध्यमातून आंदोलने करून योजना पदरात पाडून घेण्यासाठी तालुकानिहाय कृती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात १४ डिसेंबरला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शासनाने नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून १० टक्के रक्कम कापून त्यात तेवढीच रक्कम शासनाच्या वतीने टाकून निवृत्तीनंतर पेंशन देण्याची अंशदायी पेंशन योजना शिक्षक वगळता सर्व विभागात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.केंद्र सरकारच्या धर्तीवर ही योजना लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत अनेकवेळा मागण्या करुनही शासनाने ही योजना बंद केली नाही. त्यातच अनेक शिक्षकांच्या रकमा वेतनातून कापून घेतल्या. मात्र त्याचा हिशेब दिला जात नसल्याने संतापलेल्या शिक्षकांनी आता राज्यभर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या १४ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने केले आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. (वार्ताहर)
निवृत्ती वेतन योजना लागू करावी
By admin | Published: November 30, 2015 12:57 AM