भरगच्च उपस्थिती : सातरी हे आदर्श गावसास्ती: राजुरा येथून जवळच असलेल्या सातरी येथे ग्रामस्तरीय आदर्श गाव समिती व गुरुदेव सामाजिक सेवा मंडळ सिंधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदर्श गाव योजने अंतर्गत सप्तसुत्री अमंलबजावणीकरिता अंधश्रद्धा निर्मूलन व लोक सहभागाचे महत्व या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रबोधनकार सप्त खंजेरीवादक भाऊ थुटे यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रबोधनकार भाऊ थुटे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृउबा समिती राजुराचे माजी सभापती आबाजी पा. ढुमणे, राजुरा तालुका गुरुदेव सेवा मंडळचे संघटक अॅड. राजेंद्र जेनेकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, ग्रामपंचायतीचे सरपंच योगीता मून, उपसरपंच मारोती मोरे, पोलीस पाटील विजय पारशिवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप कार्लेकर, पुंडलिक वडस्कर, मारोतराव कार्लेकर, दयाराम मून, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शंकर धुर्वे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव श्रीधर पा. झुरमुरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.राजुरा तालुक्यातील सातरी या गावाची १९ जून २०१५ रोजी आदर्श गाव राज्य स्तरीय समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी स्वत: भेट देऊन पाहणी केली व सातरी गावाची निवड आदर्श गाव योजनेमध्ये झाली. तेव्हापासून या गावात सप्तसुत्री कार्यक्रमाअंतर्गत नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, लोटा बंदी, सराई बंदी, बोअरवेल बंदी, नसबंदी व श्रमदान या सप्तसूत्री अन्वये गावकऱ्यांच्या सहभागातून अंमलबजावणी सुरु आहे. या गावाच्या जलसंधारणाच्या व इतर विकास कामाकरिता पहिल्या टप्प्यात १ कोटी १९ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून विविध विकास कामे सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राम गितेचा प्रचार व प्रसार तसेच लोकसहभागाचे महत्व पटवून देण्याकरिता प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक भाऊ थुटे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मारोती मोरे, संचालन मोते गुरुजी यांनी केले तर उपस्थितांचे आभार भोयर गुरुजी यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
सातरी येथे अंधश्रद्धा निर्मूलनावर लोक प्रबोधन
By admin | Published: June 17, 2016 1:11 AM