चंद्रपूर : जिल्ह्यासह राज्यात काेराेना संकटाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डाेक्यावर आहे. यासंदर्भात वारंवार सूचनाही दिल्या जात आहे. असे असतानाही शहरी भागातील अर्धेअधिक नागरिक मास्कशिवाय बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून ५५-६० वयाेगटातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.
मास्क का वापरत नाही, अशी विचारणा केली असता, अनेकांकडून आश्चर्यकारक कारणे ऐकावयास मिळाली. दरम्यान एका दुकानदाराने वारंवार थुंकावे लागते. त्यामुळे मास्क वापरत नाही असे सांगितले. त्यामुळे एका महिलेला व महाविद्यालयीन युवतीला मास्कबाबत बाेलते केले असता, साडी व ड्रेसला मॅचिंग मास्क मिळालाच नाही, त्यामुळे आपण मास्क घातला नसल्याचे सांगितले.
प्रशासनाची कारवाईही थंडावली
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महापालिका, जिल्हा प्रशासन व आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाची विनामास्क फिरणाऱ्यांवर करडी नजर हाेती. मात्र, लाट आटाेक्यात आल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. आता शासन व प्रशासनाने काेराेनाबाबतच्या नियमात शिथिलता आणली आहे. त्यामुळे नागरिकही बिनधास्त झाल्याचे दिसून येत आहे.
मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात
मुख्य बाजारपेठ -
चंद्रपूर येथील गोल बाजारात बरीच गर्दी असते. येथे रस्त्यालगत माेठमाेठी दुकाने आहेत. यातील काही दुकानदार मास्क घालून दिसले तर काहींनी मास्क हनुवटीवर ठेवला हाेता. ग्राहक व नागरिक विनामास्क आढळून आले. यातील ७० टक्के नागरिक मास्कशिवायच होते.
बंगाली कॅम्प -
चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरातही बरीच गर्दी असते. याशिवाय येथे भाजीबाजारही आहे. मात्र अनेक जण मास्क न घालताच बिनधास्त फिरताना दिसून आले. कोरोना संकट होते, हे सुद्धा नागरिक विसरले की काय, अशी शंका यानिमित्ताने येते.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसर -
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध विभागाचे शासकीय कार्यालये आहे. या परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. मात्र अनेकजण या भागात मास्कशिवाय फिरत असल्याचे दिसून आले.
मास्क न वापरण्याची ही काय कारणे झाली?
कोरोना संकट आता काही प्रमाणात गेले आहे. रुग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे मास्क वापरणे बंद केले आहे. मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
-एक नागरिक
मास्कमुळे मेकअप, पुसून जाते. चेहरा पूर्णत: दिसत नाही. याशिवाय अनेक दिवसांपासून ड्रेसनुसार मॅचिंग मास्क मिळाला नाही. सध्या कोरोना प्रादुर्भाव नाही.
-एक नागरिक
कोरोना संकट सध्या काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे. प्रशासनातर्फे वारंवार सूचना केल्या जातात. मात्र नागरिक दुर्लक्ष करतात.
-एक नागरिक