एटीएमची सुविधा नाही : नोटाबंदीचा ग्राहकांना फटकाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस देशाची संकल्पना जाहीर केली. याच अनुषंगाने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर दोन महिन्यांपूर्वी बंदी आणण्यात आली. त्याची झळ बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावाला विसापुरातील नागरिकांनाही बसली आहे. तेथे एटीएमची सुविधा नाही. गावात राष्ट्रीयकृत बँक नाही. त्यामुळे विसापुरातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँके अभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले विसापूर गाव आहे. तेथील लोकसंख्या १५ हजारांवर असून गावात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे या बँकांचे महत्त्व नाममात्र उरल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील नागरिकांना बँकेचा व्यवहार करण्यासाठी बल्लारपूर व चंद्रपूरला जावे लागते. हा प्रकार नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. गावात एटीएमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील कर्मचारी पेपर मिल, वेकोलि, अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयात कामाला आहेत. बहुतेकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत केले जाते. गावात एटीएमधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र येथे राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नोकरदारांसह शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही बँकेच्या खातेदारांना आजघडीला राष्ट्रीयकृत बँक खात्याची सक्ती केली जात असल्यामुळे गावात सदर बँक सुरू करण्याची नितांत गरज आहे.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाची वाटचाल ‘स्मार्ट गाव’ होण्याकडे सुरू आहे. गावातील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. गावाला लागून बंगरूळूच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन तयार होत आहे. राज्यातील दुसरी केंद्रीय सैनिकी शाळा, विसापूरच्या हद्दीत होऊ घातली आहे. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू होण्याच्या मार्गावर आहे. समाज कल्याण विभागाची निवासी शाळा येथे सुरू आहे. शासकीय व निमशासकीय संस्थाची रेलचेल होत असताना गावात राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे सर्वांनाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्याने विसापूर येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा होणे गरजेचे आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर गाव नावाजलेले आहे. हे एका गावासाठी पोलीस चौकी असलेले एकमेव गाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिवंगत दादाजी सिंगाभट्टी यांच्या प्रयत्नामुळे गावात ग्रामीण बँक सुरू केली. त्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोकांची अडचण दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान थेट राष्ट्रीयकृत बँकेत जमा केले जाते. नव्या निर्णयामुळे राष्ट्रीयकृत बँक शाखेला महत्त्व आल्याने विसापुरात सदर बँक सुरू करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एटीएमची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.- रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य, विसापूर
विसापुरात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेअभावी नागरिक अडचणीत
By admin | Published: January 09, 2017 12:38 AM