लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९९.८२ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व व्होकेशनल या शाखांतील एकूण २४ हजार ७८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे यंदा परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुण देण्यात आले. यंदाही टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे.कोरोनाची दुसरी लाट उसळल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाची नवी पद्धत स्वीकारली होती. परीक्षाच होणार नसल्याने राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक नोंदविण्याच्या सूचना उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्या. उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची माहिती राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली. त्या आधारावरच अंतर्गत मूल्यांकन करून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
‘त्या’ विद्यार्थ्यांना देणार पुन्हा संधी२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार २०२१ मधील बारावी परीक्षेला श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना केली जाणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून पुढील एक-दोन संधी देण्यात येणार आहे.
असे झाले विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ३०: ३० : ४० फॉर्म्युल्यानुसार जाहीर झाले. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीचे ३० टक्के व बारावीच्या वर्षभरातील परीक्षांचे ४० टक्के गुण या आधारावर अंतिम निकाल घोषित झाला आहे. ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३० टक्के), १२ वी अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या व तत्सम मूल्यमापन गुण (३० टक्के), दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण (३० टक्के) असे यंदाच्या बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे स्वरूप होते.
विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार
अंतर्गत मूल्यमापन निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. टपाल, ई-मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदविता येईल. अर्जाचा नमुना व तक्रारींच्या निरसनासाठी अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता आदी माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.