वरोरा : शासनाच्यावतीने सबसिडीवर दरवर्षी कीटकनाशक औषधांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येतो. परंतु यावर्षी खरीप हंगाम संपला व रब्बी हंगामाला सुरूवात होवूनही शासनाकडून सबसीडीवर देण्यात येणारी कीटकनाशक औषधे शासनाच्या वितरण करणाऱ्या कार्यालयात पोहोचली नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.शासनाच्यावतीने जिल्हा परिषद सेस फंड, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य पुरस्कृत पीक संरक्षण योजना आदी योजनेतून खरीप व रबी हंगामातील पिकांवरील अळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच पिकातील झाडांना कुठलीही रोगराई होवू नये व भरघोस पीक शेतकऱ्यांच्या हाती यावे, यासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कामेथोल्ट, सल्फर, कार्बन डायझीम, सायबर मेथ्रीन, मोनोकोटोफास फ्लोरोफॉस आदी कीटकनाशक औषध शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी खरीप हंगाम संपला रब्बी हंगामाला सुरूवात झाली. परंतु सबसीडीवर मिळणारे कीटकनाशक औषधी अद्यापही पोहोचल्या नाही. त्यामुळे शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी बाजारातून किटकनाशक औषधी खरेदी करीत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसत आहेत. कपाशीला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव शासनाने जाहीर केला. पावसाच्या लहरीपणाने सोयाबीनच्या उत्पादनात घट आली. ेअशातच सध्या शेतात असलेल्या कपाशी, तूर, भात आदी पिकांवरील रोगराई थांबविण्यासाठी शेतकरी बाजारपेठेतून कीटकनाशक औषधी विकत घेत आहे. सध्या सोयाबीनचा दाणा अगदी लहान असल्याने त्याला बाजारात भाव नाही, अशावेळी शेतात असलेले पीक कसे वाचवावे, अशा विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. सबसिडीवरील कीटकनाशक औषधी कधी येणार, या प्रश्नाचे उत्तरही देण्यास संबंधित अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)
रबी हंगामासाठी कीटकनाशक औषधे पोहोचलीच नाहीत
By admin | Published: October 25, 2015 12:58 AM