चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून पेट्रोल तसेच डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आर्थिक ताण पडत आहे. विशेष म्हणजे, विमानात वापरण्यात येणाऱ्या इंधनापेक्षाही सद्य:स्थितीत पेट्रोल महाग झाल्याचे सांगितल्यास विश्वास बसणे कठीण आहे. मात्र, हे खरे आहे. जिल्ह्यात पेट्रोलचा दर १०७ रुपयांवर पोहोचले आहे. त्या तुलनेत विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ इंधनाचा भाव मात्र प्रति लिटर ६० ते ६५ रुपयेच असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना संकटामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला. काही जण रोजगारासाठी भटकत आहे. त्यातच आता पेट्रोल, डिझेल महागल्याने वाहन कसे चालवावे, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्याने अन्य साहित्यही महागले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
बाॅक्स
कोरोनामुळे खर्चात भर, पाचशेच्या ठिकाणी लागतात हजार
कोरोनामुळे प्रत्येक जण अडचणीत सापडला आहे. सार्वजनिक वाहतूक वापर कमी झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जण स्वत:चे वाहन वापरण्याकडे अधिक लक्ष देत आहे. मात्र, पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे खिसा रिकामा होत आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढून बाजारपेठ महागली आहे.
बाॅक्स
हा बघा फरक (दर प्रति लिटर)
विमानातील इंधन एफटीएफ ६५.००
पेट्रोल १०७.००
बाॅक्स
शहरातील पेट्रोल पंपाची संख्या- १२
दररोज लागणारे पेट्रोल- ३५,०००
जिल्ह्यातील वाहने
दुचाकी- ३,३८,८५१
चारचाकी- ४८२६८
कोट
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. पगाराच्या तुलनेमध्ये महागाई वाढल्यामुळे महिनाभराचा खर्च भागविताना दमछाक होत आहे. शासनाने सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून किमान इंधन दर कमी करावे. यामुळे महागाई नियंत्रणात येईल.
- माधव मडावी
चंद्रपूर
कोट
पेट्रोल-डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. आधीच पगार कमी आहे. त्यातच महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न आहे. शासनाने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यास महागाई कमी होईल.
-मनोज राखुंडे, चंद्रपूर