जडवाहतुकीवर निर्बंध घालण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांची क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जडवाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण
राजुरा : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रात्री घराबाहेर निघणे कठीण झाले. शहरातील अनेक वॉर्ड आणि मुख्य चौकात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला.
उद्योगांची निर्मिती करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील नागभीड, सिंदेवाही, सावली, मूल, आदी तालुक्यांत उद्योग नसल्याने येथे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्याताच कोरोना संकटामुळे बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. त्यामुळे रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघुउद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
जिवती : तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवास करताना विविध अडचणी येतात. याकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचत असून, अपघाताची शक्यता आहे.
वीज खांबामुळे अपघाताचा धोका
चंद्रपूर : येथील अनेक वॉर्डांतील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. ते खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलविण्याची मागणी केली जात आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी करण्यात आली होती.
आठवडी बाजार
सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील आठवडी बाजार अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाने नियम तसेच अटी लादून आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. वेगवेगळ्या दिवशी जिल्ह्यात आठवडी बाजार भरत होता. यामुळे छोटे-मोठे व्यापारीही यावर अवलंबून होते. मात्र, बाजार बंद झाल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
मच्छरांच्या प्रकोपाने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. नागरिकांकडूनही रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार आता बंद झाले आहेत. परंतु, नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.