नागभीड : गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असलेले ‘त्या’ मृत वाघिणीचे ते बछडे प्रत्यक्ष कोणास दिसले नसले तरी वनविभागाने त्या बछड्यांना डुकराची मेजवाणी देणे सुरू केल्याची विश्वसनीय माहिती आहे. दरम्यान शोधपत्रकाच्या लवाजम्यात गुरुवारपासून आणखी वाढ करण्यात आली आहे. ३ सप्टेंबरला सावंगी जंगलात एक वाघिण मृतावस्थेत आढळल्यानंतर तिला असलेले तिन्ही बछडे सुद्धा बेपत्ता झाले. गेल्या सात-आठ दिवसांपासून वनविभाग या बछड्यांचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. असे असले तरी या बछड्यांचा काहीच सुगावा लागलेला नाही. सद्यस्थितीत या बछड्यांचे वय सहा ते सात महिन्याचे आहे. ते स्वत: शिकार करू शकत नाही. म्हणजेच ते परावलंबी आहेत. गेल्या १३-१४ दिवसांपासून ते उपाशीच असल्याचा अंदाज आहे. त्या बछड्यांची उपासमार होऊ नये, यासाठी वनविभागाने डुकराच्या मेजवाणीचा बेत आखल्याचे समजते. एका अधिकाऱ्यानेही या बाबीस दुजोरा दिला आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार यासाठी वनविभागाने गावातून एक डुकर विकत घेतल्याची माहिती आहे. या डुकराचे तुकडे करून या बछड्यांचे ज्या परिसरात पगमार्क आढळून आले त्या परिसरात ते मांस वनविभाग ठेवणार असल्याचे सुत्राने सांगितले. दरम्यान मंगळवारपासून बछड्यांच्या शोधासाठी लावण्यात आलेल्या फौजफाट्यातील लवाजम्याची संख्या बरीच कमी करण्यात आली होती. मात्र बुधवारी वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक सुधाकर डोळे यांनी मिंडाळा कंपार्टमेंटला भेट दिल्यानंतर गुरुवारपासून या ताफ्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. आता जवळपास ५० अधिकारी कर्मचारी या ताफ्यात ठेवण्यात आले आहेत. (तालुका प्रतिनिधी) पगमार्क बछड्यांचेच का? ४बछड्यांचे पगमार्क दिसल्याच्या परिसरात वनविभाग डुकराचे मांस बछड्यांसाठी ठेवत आहे. जर हे पगमार्क त्या बछड्यांचेच असतील तर त्या परिसरात शोधकार्याची गती आणखी तेज करून बछडे ताब्यात का घेण्यात येत, नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बेपत्ता बछड्यांना डुकराची मेजवाणी
By admin | Published: September 16, 2016 1:42 AM