पत्रकार परिषद : अखिल भारतीय आदिवासी महासभेचा निर्णयचंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड टेकड्यामधील लोह-खनिजाचे उत्खनन सुरु आहे. याविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे आंदोलन सुरु आहे. जनतेला विश्वासात न घेता मुजारीने चालविलेल्या सुरजागड उत्खननाविरोधात अखिल भारतीय आदिवासी महासभेने जनहित याचिका टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, नगरसेवक संजय वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.सुरजागड येथील लोह - खनिज काढून नेण्यासाठीचे कंत्राट लॉयड्स मेटल्स अॅण्ड इंजिनिअर्स लि. डोंबीवली (इस्ट) जिल्हा ठाणे या कंपनीला देण्यात आले आहे. याला स्थानिकांचा विरोध आहे. उत्खनन कार्य स्थगित करुन जिल्ह्यातच प्रकल्प उभारुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करुन सुरजागड येथील उत्खनन कार्य सुरुच आहे. भामरागड वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी लोह, खनिज वाहून नेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपनीने मोठमोठे वृक्ष तोडून टाकले. रस्ता बनविण्याच्या नावाखाली गैरकायदेशिरपणे जंगल उद्धवस्त करण्याचा सपाटा सुरु केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीला २० वर्षाचा काळ लोटला. मात्र आतापर्यंत येथील औद्योगिक विकास झाला नाही. जिल्हानिर्मितीनंतरही एकही उद्योग येथे सुरु झाला नाही. सरकारने आताच सुरजागड पहाडावरील लोहखनिजांचे उत्खनन करण्यात आलेले लोहखनिज वाहतूक करण्याचे काम लॉयड्स मेटल या कंपनीला दिले. याविरोधात सुरजागडवासींचा लढा सुरु आहे. जिल्ह्यातील खनिज संपती बाहेर न नेता येथेच लोकप्रकल्प उभारुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. येथे सुरु असलेले आंदोलनही दडपण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे सरकारविरोधात जनतेच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे अमृतकर, पप्पू देशमुख, संजय वैद्य, नामदेव कन्नाके, डॉ. महेश कोपुलवार यांनी यावेळी सांगितले. (नगर प्रतिनिधी)
सुरजागडसंदर्भात जनहित याचिका दाखल करणार
By admin | Published: April 29, 2016 1:10 AM