भेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथील शासकीय आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर उभा असून एकही जबाबदार अधिकारी या आश्रमशाळेत नाही. येथील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असून निवासी शासकीय आश्रमशाळा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. या आश्रमशाळेत मुली ६७ तर मुले ५१ सर्व निवासी आहेत. या विद्यार्थ्यांची निवासाची व शिक्षणाची जबाबदारी असलेलेच येथील अधिकारी मागील सहा महिन्यांपासून बदली होऊन गेल्याने प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर कारभार सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काहीही देणे-घेणे प्रशासनाला नसल्याचे दिसते. या आश्रमशाळेत २६ मार्च २०१२ रोजी आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभागामार्फत विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाण्यासाठी सोलर वाटर प्रकल्प मंंजूर असून त्यांचे साहित्य आश्रमशाळेत पडले आहेत.दोन वर्षांपासून हे साहित्य पडून असतानाही प्रशासनाच्या वतीने या प्रकल्पाला आश्रमशाळेत जागाच नसल्याचे कारण पुढे करुन साहित्य धूळखात ठेवले आहेत. आश्रमशाळेत जागा उपलब्ध असून साहित्य आल्यापासून आश्रमशाळेत सोलरवॉटर प्रकल्प लावण्याकरिता कुणी आलेच नसल्याचे वास्तव्य तेथील कर्मचाऱ्यांनी सदर प्रतिनिधीसमोर मांडले.या आश्रमशाळेत मुलींसाठी प्रसाधनगृहाची वेगळी सोय केली आहे. मात्र हे प्रसाधनगृह सध्या घाणीच्या विळख्यात आहे. यावरुन तेथील स्वच्छतेबाबत शाळा प्रशासन किती जागरुक आहे, याची जाण होते. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या आश्रमशाळेत सहा महिन्यांपूर्वी मुख्याध्यापक कापसे यांची बदली झाल्याने त्याऐवजी दुसरे कुणी मुख्याध्यापक आले नाही. तसेच अधीक्षक माळी यांची बदली सहा महिन्यांपूर्वीच झाल्याने त्यांचे अधीक्षक पद रिक्त असून प्रभार चालाख या शिक्षकांकडे आहे तर मुलींसाठी अधिक्षिका या वर्षभरापासून नसल्याने त्याही प्रभारीच आहेत. आश्रमशाळेत १ ते १४ वर्षापर्यंत वयोगटातील विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे कपडे धुण्याकरिता शाळा व्यवस्थापनाने कुठलीही सोय केली नाही. या मुलांना स्वत:चे कपडे धुता येत नसल्याने विद्यार्थ्यांना मळकट कपडे घालून विद्यार्जन करावे लागत आहे. डोक्याला लावण्याचे तेलही विद्यार्थ्यांना वर्षभरापासून मिळालेले नाही. संस्कारमय वयातच विद्यार्थ्यांना बेशिस्तीचे धडे मिळत असल्याने पालक वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. (वार्ताहर)
पिपरीदीक्षित आश्रमशाळा वाऱ्यावर
By admin | Published: November 27, 2014 11:30 PM