चंद्रपूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पिपरीत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पारस पिंपळकर यांनी केली होती. यासंदर्भातील निवेदन त्यांनी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले होते. याची दखल घेत त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्या निवेदनाची दखल घेत पिपरी येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी या केंद्राचे उद्घाटन झाले.
कोरोना लसीकरणाची अडचण लक्षात घेता काही दिवसापूर्वी माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पारस पिंपळकर यांनी साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घुग्घुस येथून लसीकरणासाठी नेले होते. गावातील जवळपास तीनशे जणांचे त्यांनी लसीकरण करून घेतले होते. आता दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. राज्य शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, गावात लसीकरण केंद्रच नाही. त्यामुळे घुग्घुस जाऊनच लसीकरण करावे लागत होते. ही अडचण लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य पारस पिंपळकर यांनी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्याची दखल घेत गुरुवारी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी सरपंच वैशाली माथने, माजी सरपंच पारस पिंपळकर, उपसरपंच हरिओम पोटवडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आवारी, भुवन चिने, चंदू माथने, रंगराव पवार, डॉ. प्रिया पोले, कानटेकर, कावळे, ज्योती वाकुलकर, सारीता निब्रड, माधुरी कंडे यांची उपस्थिती होती.
--
पिपरी येथे आता लसीकरण केंद्र सुरू झाले. त्यामुळे आता या गावातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी घुग्घुस जावे लागणार नाही. गावातच लसीकरण होईल. सोबतच पिपरी धानोरा, सिदुर, मारडा या गावातील नागरिकांना या लसीकरण केंद्राचा लाभ घेता येईल.
- पारस पिंपळकर,
ग्रामपंचायत सदस्य, पिपरी.