चंद्रपूर : येथील नगिनाबाग परिसरामध्ये अमृत जल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने तसेच सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. परिणामी अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे नगिनाबाग परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करावे, अशी मागणी भूमिपुत्र बिग्रेडने केली आहे. यासंदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नगिनाबाग प्रभाग क्रमांक ९ मध्ये अमृत जल योजनेंतर्गत गुरांचा दवाखान्यासमोरील रस्ता, धम्मकीर्ती बुद्धविहार ते रहेमतनगर रस्ता, हनुमान मंदिर देवस्थानपासून शुभमंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी सर्वत्र खड्डे पडले असून, रस्त्यावर चिखलही साचला आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. महापालिका प्रशासनाने तत्काळ या रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष विवेक बोरीकर, जिल्हा प्रवक्ता सुनील मुसळे, जिल्हा महिला संयोजक छाया सोनुले, कोषाध्यक्ष संगीता पेटपुले, साळूबाई चौधरी, सुनंदा निकोडे, पूजा पेटकुले, सुरेखा निकोडे, रेखा कावडे आदींनी दिला आहे.