चंद्रपूर: पोलीस म्हटले की केवळ कायदा व सुव्यवस्था आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र, असे एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्राशी पोलिसांचा संबंध येत नाही. छोटासा अपघात झाला तरी पोलिसांना तत्काळ घटनास्थळी पोहोचावे लागते.
गडचांदूर परिसरात सध्या रोज छोट्या-मोठ्या अपघातामुळे काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. रोज होणाऱ्या अपघातांची मालिका पाहून ठाणेदार सत्यजित आम्ले यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधीलकीचा परिचय दिला. ट्रॅक्टर, मुरूम व मजुरांसह ठाणेदारांनी स्वतः उपस्थित राहून रस्त्यांवरील खड्डे बुजवून घेतले.
गडचांदूर-कोरपना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूर्वी हा मार्ग राज्य बांधकाम विभागाकडे होता, आता राष्ट्रीय महामार्गाकडे हा मार्ग हस्तांतरित झाल्यामुळे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखविताना दिसतात. त्यामुळे नागरिकांच्या जिवासोबत खेळ सुरू आहे.
नुकताच २९ सप्टेंबरला वडगावजवळ खड्ड्यांमुळे दोन दुचाकी आपसात भिडून एकाचा जागीच मृत्यू झाला होता. १ ऑक्टोबरला हरदोना गावाजवळ अपघात होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. नव्याने गडचांदूर येथे रुजू झालेले ठाणेदार सत्यजित आम्ले यांनी गांधी जयंतीनिमित्त स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून माणुसकीचा परिचय करून दिला. ठाणेदारांच्या या कृतीचा लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने बोध घेणे आवश्यक आहे.