चंद्रपूर : ‘कोरोनामुक्त गाव’ या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मिशन मोडवर नियोजन करावे आणि लसीकरणासाठी यंत्रणेने प्रत्येक गावात पोहोचावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर गावांचे १०० टक्के लसीकरण गरजेचे आहे. सध्या प्रादुर्भाव कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. कोरोनाविरुद्ध लढाईत लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. लसीकरणासाठी कमी प्रतिसाद असलेल्या केंद्रांवरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गावस्तरावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी डेल्टा प्लस विषाणूबाबत माहिती दिली. मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, न. प. मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते.
तालुका कृती दलाची दोनदा बैठक अनिवार्य
न. प. क्षेत्रात मुख्याधिकारी व अधिनस्त कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांच्या समन्वयातून टीम गठन करावे. लसीकरण व म्युकरमायकोसिसबाबत जागृती करावी. कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण व हक्क मिळवून देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत. लसीकरणासाठी एसडीओंनी तालुकास्थळी आठवड्यातून दोनदा कृती दलाची बैठक घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.