हा उपक्रम नागरिकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. वृक्षप्रेमी कुणाल चन्ने यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून वृक्षप्रेमी भास्कर यांनी राजुरा येथील मालगुजारी तलाव, स्वामी विवेकानंद नगर, गणपती मंदिर परिसर, ग्रामीण रुग्णालय राजुरा, तक्षशिलानगर बामनवाडा, छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान, नवजीवन कॉलनी, संकटमोचन हनुमान मंदिर राजुरा येथे विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून संवर्धन करण्याचा विडा उचलला आहे. एवढेच नव्हे तर ज्यांचा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस असतो अशावेळी ते त्यांना विविध वृक्ष भेट देतात. आतापर्यंत त्यांनी विविध वृक्ष जसे आंबा, पिंपळ, वड, आवळा, कडुलिंब. करंज, भोकर, वृक्ष भेट दिले व वृक्षारोपण केलेले आहे .सकाळी व सायंकाळी दोन तास ते वृक्षांच्या संवर्धनात सतत मग्न असतात.
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबरोबरच त्यांनी पक्ष्यांच्या पाण्यासाठी रिकाम्या प्लास्टिक बॉटल गोळा करून त्याचा वापर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत लॉज राजुरा ते स्वामी विवेकानंद नगरपर्यंत झाडांना प्लास्टिक बॉटल बांधून त्याचा पक्ष्यांच्या पाण्यासाठी वापर केलेला आहे.
त्यांच्या या कार्यात त्यांना नगराध्यक्ष अरुण धोटे, सर्वानंद वाघमारे, राममोहन पेंदापल्लीवार, डॉ. उमाकांत धोटे, गौतम देवगडे, किशोर पडोळे, शरदचंद्र मासीरकर, बाबूराव मडावी, विजय परचाके, शेषराव वानखेडे, केवलदास तोडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.