नितीन मुसळे
सास्ती : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांना ऑक्सिजनसाठी ताटकळत राहून ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागत आहे. अशा स्थितीत भविष्यात आपल्या गावातील नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळून त्यांची प्रकृती नेहमी सुस्थितीत राहावी, असा उदात्त हेतू ठेवून कोरोनाकाळात गावात होणाऱ्या प्रत्येक लग्न सोहळ्याप्रसंगी नवविवाहित जोडप्याच्या हस्ते वृक्षलागवड करून या नवदांपत्यांची आयुष्यभराची आठवण जोपासण्याचा स्तुत्य उपक्रम राजुरा तालुक्यातील कळमणा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविला जात आहे.
राजुरा तालुका तसा औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रचलित आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, कोल वॉशरीज, लागूनच असलेल्या कोरपना तालुक्यात मोठमोठे सिमेंट उद्योग आहेत. त्यामुळे या परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना श्वसनाचे आजार झाले आहेत; परंतु उद्योजक किंवा प्रशासन प्रदूषणावर मात करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. या उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमविला जात असला तरी परिसरातील नागरिकांना मात्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रुग्णांना ऑक्सिजनसाठी मारामार करावी लागत आहे. अशा परिस्थितीत राजुरा तालुक्यातील कळमणा ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकिशोर वाढई, पोलीसपाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या कावळे यांच्या पुढाकारात कोरोनाकाळात गावात होणाऱ्या प्रत्येक लग्न सोहळ्यातील नवविवाहित जोडप्याच्या हस्ते गावात वेगवेगळ्या झाडांची लागवड करून गावातील नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळावे, तसेच प्रदूषणावर मात करण्याचा एक प्रयत्न म्हणून उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव गावकऱ्यांसमोर मांडला. नागरिकांनीसुद्धा यास प्रचंड प्रतिसाद देऊन झाडांची लागवड करणे, त्याची जोपासणा करणे याकरिता लागणारी आर्थिक मदत करून हा उपक्रम सुरू केला. कोरोनाकाळात गावात छोटेखाणी विवाह सोहळे होत आहेत. या लग्न सोहळ्यानंतर नवविवाहितांच्या हस्ते गावात विविध प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात करण्यात येत आहे.