जनावरांचा बंदोबस्त करा
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे असून यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नागपूर-चंद्रपूर रोडवर रात्रीच्या वेळी रस्त्यावरच जनावरे बसून राहतात. एखाद्या वेळी वाहनचालकाचे दुर्लक्ष झाल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, ऊर्जानगरकडे जाणाऱ्या पुलावरही मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे बसून राहत असल्याने ट्रकचालकांना मोठ्या शिताफीने ट्रक चालवावा लागत आहे.
पुस्तक विक्रेत्यांना लागली आशा
चंद्रपूर : शाळा सुरू करण्यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहे. त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांना ग्राहक येतील, अशी आशा लागली आहे. यावर्षी ऑगस्ट महिना उजाडला असतानाही अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात पुस्तकांची खरेदीच केली नाही. परिणामी पुस्तक विक्रेते शाळा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
शाळा सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : ऑगस्ट महिना अर्धा संपला असतानाही अद्यापही शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे शेतात जायचे की, मुलांना सांभाळायचे, असा प्रश्न सध्या ग्रामीण भागातील पालकांना पडला आहे. त्यामुळे ज्या गावात कोरोनाचे रुग्ण नाही, अशा गावांतील प्राथमिक शाळा सुरू कराव्या, अशी मागणी पालकांनी केली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शाळात विद्यार्थी पटसंख्या कमी असते, त्यामुळे कोरोनाचा धोका होण्याची शक्यता नाही. मात्र सुटी असल्यामुळे मुले दिवसभर गावात इकडे-तिकडे फिरत असल्याने त्यांना इतर धोका होण्याची अधिक शक्यता असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.
रस्त्यांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागात पाणी जाण्यासाठी बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. शहरातील सिस्टर कॉलनी, नगिनाबाग, जगन्नाथबाबा नगर तसेच इतर काही सखल भागामध्ये पावसाचे पाणी साचते.