लोकांचा उत्स्फूर्त सहभाग : आता झाडे जगविण्यासाठी सहकार्य अपेक्षितचंद्रपूर : राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शुक्रवारी जिल्ह्यात सुमारे २२ लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील गावागावात नागरिक स्वयंस्फूर्तीने वृक्ष लावताना दिसून आले. विविध सामाजिक संघटनाही याच कामात व्यस्त असल्याचे दिसून येत होते. दरम्यान, चंद्रपूर जिल्हयात वृक्षारोपणाचा जिल्हास्तरीय मुख्य सोहळा मूल मार्गावरील चंद्रपूर वनप्रबोधनीलगत कंम्पार्टमेंट क्रमांक ४०३ मध्ये पार पडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन जिल्ह्यात या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महापौर राखी कंचर्लावार, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य क्षेत्र संचालक जी.पी.गरड, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक बी. आर. काळे, महामंडळाचे महाव्यवस्थापक डोळे, मनपा सभापती संतोष लहामगे, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, वातावरणामध्ये वारंवार बदल घडत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे व वनक्षेत्र वाढविण्याची नितांत गरज आहे. झाड असेल तर माणूस जगेल. प्रत्येकाला झाडापासून मिळणाऱ्या प्राणवायूची गरज असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी राज्यात दोन कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या संकल्पनेला जिल्हयातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, स्वंयमसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, शासकीय, खाजगी शासकीय संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय व ग्रामीण भागातील नागरिकांनीसुध्दा मोठया संख्येने सहभाग नोंदविला असल्याचे सलिल यांनी यावेळी सांगितले. जिल्हयात आज २२ ते २३ लाख वृक्ष लागवड करण्याचा निर्धार असून यापेक्षा जास्त वृक्ष लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हयातील शासकीय नर्सरीतील २० लाखांपेक्षा अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप झाले असून खाजगी नर्सरीतूनसुध्दा रोपांचा पुरवठा नागरिकांना करण्यात येत आहे. वृक्ष लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. आता झाडे वाचविण्यासाठीसुध्दा लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यामुळे जिल्हयात मोठया प्रमाणात झाडे निर्माण होवून वनक्षेत्रात वाढ होणार असल्याने जिल्हयात असलेले प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही सलिल यांनी व्यक्त केला. वनविभागाच्या जागेवर मूल रोडवरील वनप्रबोधनीलगतच्या कंम्पार्टमेंट क्रमांक ४०३ मध्ये १२ ते १३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)मनपाकडून २५ हजारांहून अधिक वृक्षांची लागवडचंद्रपूर महानगरपालिकेकडून २५ हजारांहून अधिक रोपांची आज लागवड करण्यात आल्याची माहिती मनपाचे उपायुक्त विनोद इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घंटागाडीच्या माध्यमातून इच्छुकांना घरोघरी पाच हजार रोपट्यांचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांना सहा हजार रोपटे देण्यात आली. स्वत: मनपा प्रशासनाकडून १५ हजार वृक्षांची आज लागवड करण्यात आली. याशिवाय नगरसेवकांनीही नियोजन करून वृक्षांची आपापल्या परिसरात लागवड केली. या वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येक झोन प्रमुखांकडे सोपविण्यात आली आहे.
२२ लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण
By admin | Published: July 02, 2016 1:02 AM