बल्लारपूर : राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. निवडणुकीला पक्षांतर्गत गटबाजी संपवून एकदिलाने सामोरे जाण्याऐवजी गैरमार्गाने अध्यक्षपदावरुन हटविल्याप्रकरणी बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एम. बालबरैय्या यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, महासचिव अॅड. गणेश पाटील व जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या विरोधात बल्लारपूरच्या न्यायालयात भादंविच्या कमल ५००, ३४ अन्वये केस दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.बल्लारपूर येथील माजी नगराध्यक्ष व शहर काँग्रेसचे अध्यक्ष एम. बालबैरय्या सन १९७८ पासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. दरम्यान त्यांच्या कार्यामुळे येथील नागरिकांनी त्यांना सर्वसाधारण निवडणुकीत नगरपालिकेच्यया अध्यक्षपदी बसविल्याचा इतिहास आहे. त्यांच्या कार्यकाळात बल्लारपूर शहराचा विकास होऊन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. गत १५ वर्षापासून शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडून शहरात काँँग्रेसला सत्ता मिळवून देण्यास महत्वाची भूमिका पार पाडली आहे. परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेसी नेत्यांना डावलण्याचे कार्य होती घेऊन जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवख्या माणसाला विराजमान केले. परिणामी काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच बल्लारपूरचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष एम. बालबैरय्या यांना लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरुन पक्षातून काढल्याचा फतवा काढण्यात आला. ज्यांची निष्ठा काँग्रेस पक्षावर असूनही त्यांनाच पक्षातून बेदखल केल्याने शेवटी एम. बालबरैय्या यांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला आहे. त्यांनी येथील प्रथमश्रेणी न्यायालयात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह तीन जणांविरुध्द याचिका दाखल केली आहे. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपूरच्या न्यायालयात माणिकराव ठाकरेंविरुध्द याचिका
By admin | Published: June 28, 2014 2:27 AM