लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडाळी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या प्रदूषणामुळे या भागातील कास्तकारांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे आधी प्रदूषण थांबवा नंतर ग्रेस इंडस्ट्रीजच्या प्रस्तावित वीज प्रकल्पाला परवानगी द्या, असा घेतलेला ठराव येरूर, साखरवाही व ताडाळी तीन ग्रामपंचायतींनी ताडाळी एमआयडीसीतील ग्रेस इंडस्ट्रीजच्या २५ मेगावॅट कॅप्टिव्ह प्रकल्पाच्या विस्तारीकरणावर शुक्रवारी कंपनीच्या आवारात झालेल्या पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणीत मांडून ग्रामस्थांनी विरोध केला, तर कंपनी व्यवस्थापनानेही हा प्रकल्पाचे रोजगारानिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगितले.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर. आर. वसावे, उपप्रादेशिक अधिकारी जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी भूगावकर, ग्रेस उद्योगाचे महाप्रबंधक परमार व अन्य अधिकारी उपस्थित होते. येरूर, ताडाळी, साखरवाही, मोरवा, शेणगाव, पांढरकवडा, सोनेगाव परिसरातील शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.ताडाळी उद्योग वसाहतीत असंख्य उद्योग आहेत. या सर्व उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. परिणामी या भागातील कास्तकारांची शेती पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहे. शेतात कापूस, गहू, सोयाबीन व तूर यापैकी एकही पीक होत नाही, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे आधी प्रदूषण थांबवा, नंतर परवानगी द्यावी, अशी मागणी कामगार नेते दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात येरूर, साखरवाही व ताडाळी ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी केली.या कंपनीने उद्योगातून शेकडो कामगार काढून टाकले आहेत. त्यांच्या जागेवर नवीन कामगारांची भरती केली आहे. सध्या ३५० कामगार या उद्योगात नोकरीवर घेतल्याचे दाखवत असले तरी प्रत्यक्षात ही संख्या कमी आहे, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. काही कामगारांनीही कंपनीच्या आपला आक्षेप नोंदवला. येरूर सरपंच आमटे, सारवाही सरपंच बोंडे व ताडाळी इंदिरा कासवटे यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वाढीव वीज प्रकल्प सुरू करण्यास परवानगी देवू नये, या आशयाचे निवेदन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. रोशन पचारे, रमेश बुचे, नामदेव डाहुले यांनीही प्रदूषणामुळे पिकांची नासाडी होत असल्याचे लक्षात आणून दिले. आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेकडे लागले आहे.प्रकल्पाला तीन ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे विरोध दर्शविला. कंपनीतर्फे आपल्या विस्तारीत प्रकल्पाबाबत सर्व माहिती जनसुनावणीच्या माध्यमातून पुढे ठेवण्यात आली. सीएसआर फंडाच्या माध्यमातून विकास कामे केली जाणार असून रोजगाराच्या संधी वाढतील. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसारच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.- जसवंत परमार, महाव्यवस्थापक, ग्रेस इंडस्ट्रीज, एमआयडीसी, ताडाळी.
आधी प्रदूषण थांबवा नंतरच प्रकल्प विस्तार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 11:51 PM
ताडाळी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या प्रदूषणामुळे या भागातील कास्तकारांची शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे आधी प्रदूषण थांबवा नंतर ग्रेस इंडस्ट्रीजच्या प्रस्तावित वीज प्रकल्पाला परवानगी द्या, असा घेतलेला ठराव येरूर, साखरवाही व ताडाळी तीन ग्रामपंचायतींनी .......
ठळक मुद्देतीन ग्रामपंचायतींचा ठराव : पर्यावरणविषयक जनसुनावणी