अपघातात वाढ
फोटो
शंकरपूर : चिमूर-कान्पा महामार्गावर काही वर्षांपासून खड्डे पडलेले आहेत. अद्यापही त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. मागील पाच वर्षात या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे राज्य महामार्ग विभागाने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व प्रवासी करीत आहेत.
राज्यमार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे कान्पा ते चिमूर रस्ता धोकादायक बनला आहे. हा रस्ता शहरात येणारा मुख्य रस्ता व महामार्ग असूनही संबंधित विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यात मागच्या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहे. रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. पावसाळ्यापासून या मार्गावर रोज छोटे मोठे अपघात होत असून, राज्य महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक वाहन चालकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागत आहे.
काही दिवसांपूर्वी येथे खड्डा वाचवण्याच्या नादात दुचाकीचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेल्या कारच्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तरीही महामार्ग विभाग या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.