लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा-गडचांदूर-परसोडा या आंतरराज्यीय महामार्गाची बºयाच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे चालकास वाहन चालविणे कठीण होत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी उखडलेल्या रस्त्याची दुर्दशा पाहून दुरुस्तीची मागणी केली. परंतु अद्यापही दुरुस्तीचे काम सुरु झाले नाही. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता झोपेत असल्याचे दिसून येते.राजुरा-गडचांदूर-परसोडा हा आंतरराज्यीय मार्ग असून तेलंगणा राज्याला जोडणारा मार्ग आहे. या मार्गाने नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. या परिसरातील सिमेंट कारखान्यामधील सिमेंटची वाहतूक याच रस्त्याने केली जाते. तसेच इतर वाहतुकही याच मार्गाने होत असते. यावर्षी जास्त पाऊस पडला नसतानाही रस्त्याची दुरवस्था झाली. बºयाच ठिकाणी रस्ता उखडून डांबरीकरणाच्या मातीवर आले आहे. त्यामुळे डांबरीकरणाचे अस्तित्व दिसत नाही. परिणामी खड्यातून वाहन काढणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे हा मार्ग आंतरराज्यीय आहे की, खड्यांचा रस्ता, अशी अवस्था बनली आहे.याच मार्गाने नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व ना. हंसराज अहीर यांनी प्रवास केला. तेव्हा त्यांनी रस्त्याची अवस्था पाहून प्रशंसा करीत अशा प्रकारचा आंतरराज्यीय मार्ग राज्यात कुठेच दिसत नाही, असा टोला लगावला होता. राजुराकडून आदिलाबाद जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी आहे.
राजुरा-गडचांदूर-परसोडा आंतरराज्यीय मार्गाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 11:50 PM