वाढोणा-सावर्ला-तळोधी हा अत्यंत महत्त्वाचा आणि कमी अंतराचा मार्ग आहे. मात्र, वाढोणा-सावर्ला मार्ग पूर्णतः उखडलेला असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक, सायकल व दुचाकी चालकांना, तसेच शेतकऱ्यांना या मार्गांवरून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
परिसरातील तळोधी हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. वाढोणा, जीवनापूर, टोला, खडकाडा, कचेपार, आलेवाही, आवळगाव आदी गावांतील नागरिकांना तळोधी येथे सावरगाव मार्गे जाण्यासाठी खूप लांब अंतर पडते. मात्र, वाढोणा-सावर्ला-तळोधी हा खूप कमी अवधीचा आणि जवळचा मार्ग आहे. मात्र, वाढोणा ते सावर्ला मार्ग पूर्णतः उखडलेला असल्याने आणि जागोजागी खड्डे पडून रस्ता छोट्याशा वाटेसारखा झाला आहे. या मार्गांवरून ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.