बल्लारपूर : सहा जिल्ह्यातून तडीपार असलेला आरोपी यदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक (२९, रा. सुभाष वार्ड) याला बल्लारपूर पोलिसांनी कॉलरी परिसरातील काटा गेटजवळ सापळा रचून साथीदारासह अटक केली आहे. त्याच्याकडून देशी कट्टा व चार जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहेत. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास केली. पोलीस तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत. हे आरोपी सुरज बहुरिया याच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची बाब तपासात पुढे आल्याने मोठा अनर्थ टळला.
यदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक हा कंबरेला देशी कट्टा खोचून दुचाकीवरून साथीदार बालाजी वॉर्डातील फारुख ऐयाश शेख (२५) यांच्यासह बदला घेण्याच्या उद्देशाने फिरत आहे, अशी माहिती मिळताच ठाणेदार उमेश पाटील यांनी सतर्कता दाखवून सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड, मुलानी, पीएसआय चेतन टेभुर्णे, अनिल चांदोरे, नापोशी सतीश पाटील, शरद कुडे, सीमा कोरते, विशिष्ट रंगारी, रतन पेंदाम व सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी सापळा रचला. दोन्ही आरोपींना पकडून त्यांच्याकडून देशी कट्टा व चार जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम १४२ मुपोका, सहकलम ३ / २५ आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
सात महिन्यांपूर्वी बल्लारपुरात दिवसाढवळ्या भररस्त्यात सुरज बहुरिया हत्याकांड घडले होते. सुरज बहुरिया याची देशी कट्ट्याने गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यातील आरोपी नुकतेच सुटून आले आहे. तडीपार यदुराज उर्फ बच्चू हा सुरज बहुरिया याचा उजवा हात समजला जात होता. तो सुटून आलेल्या आरोपीच्या शोधात होता. परंतु याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना मिळाल्याने सुरज बहुरिया खूनाचा वचपा काढण्याचा कट उधळला गेला.