पोंभुर्णा : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल पोंभुर्णा तालुक्याचा आपण जलद गतीने विकास करणार असून येत्या पाच वर्षांमध्ये तालुक्यातील एकही रस्ता कच्चा दिसणार नाही. संपुर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जाणार असून पोंभुर्णा शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी नगरपंचायतीने प्रयत्न केल्यास आपण पोंभुर्णा नगरपंचायत राज्यातून प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा येथे आयोजीत चौक संपर्क अभियानात शास्त्रीनगर चौकामध्ये शनिवारी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ना. मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम येथील नगरपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन गोरंटीवार व उपाध्यक्ष ईश्वर नैताम यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर मुनगंटीवारांनी पोंभुर्णा शहरातील ६ चौकामध्ये आयोजीत चौक संपर्क अभियानात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, पोंभुर्णा शहराच्या विकासासाठी आपण ७ कोटी रुपये मंजूर केले आहे. तर जानाळा-पोंभुर्णा रस्त्याच्या कामासाठी मंजूर केलेल्या २५ कोटी रुपयाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद कडू, हरीश शर्मा, रामलखीया, नवनिर्वाचीत नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, उपाध्यक्ष ईश्वर नैताम, कृउबा सभापती राहुल संतोषवार, जिल्हा परिषद सदस्या अल्का आत्राम, कृउबा उपसभापती हरीश धवस, कृउबा संचालक अजीत मंगळगिरीवार, नंदू तुमुलवार, पंचायत समिती सभापती चिंचोलकर, उपसभापती महेश रणदिवे, निलेश शादरपवार, नरेंद्र बघेल, अप्रोच खानभाई, बंडू बुरांडे, मारोती देशमुख, प्रभाकर पिंपळशेंडे, लोणारे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)अन् पालकमंत्री दुचाकीवर बसले४पोंभुर्णा येथे चौक संपर्क अभियान कार्यक्रमासाठी शनिवारी येथे आलेले ना. सुधीर मुनगंटीवार यांनी येथे ६ चौकांमध्ये कार्यक्रम असल्याने लाल दिव्याची गाडी सोडून प्रत्येक चौकामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एका कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर बसून कार्यक्रमस्थळी गेले. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये कुतुहलाचा विषय निर्माण झाला होता. मात्र त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांची व सुरक्षा रक्षकांची दुचाकीमागे धावत जाताना प्रचंड दमछाक होताना दिसली.
पोंभुर्णा नगरपंचायत राज्यात प्रथम आणण्याचा प्रयत्न करणार
By admin | Published: December 07, 2015 5:21 AM