परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संपूर्ण जग जवळ करणारा मोबाइलच पती-पत्नीच्या दुराव्याचे मुख्य कारण बनत असल्याचे चित्र भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येत आहे. सततचा मोबाइल वापर व मद्याने सुखी संसारात विष कालवल्याचे मागील वर्षभरात भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारीवरून दिसून येते. भरोसा सेलने ११ महिन्यांत ८५१ तक्रारी आल्या. त्यापैकी ७७१ तक्रारींचा निपटारा करण्यात त्यांना यश आले आहे. कुठे पत्नी तर कुठे पती सतत मोबाइलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे दोघांचाही तीळपापड होतो. यातूनच अनेक दाम्पत्यात वाद निर्माण होतात. काही प्रकरणात पती दररोज दारूच्या नशेत झिंगाट होऊन घरी येतो. त्यामुळे दररोज वाद होतात. काही ठिकाणी सासरच्या जाचातून सुनेचा छळ होतो. अशा नानाविध तक्रारींचा पाऊसच भरोसा सेलकडे येत आहे. मागील ११ महिन्यांत एकूण ८५१ तक्रारी भरोसा सेलकडे आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांच्या नेतृत्वात दोघांचीही समजूत घालून समुपदेशनातून पुन्हा मेळ घालून दिला. त्यामुळे पूर्वी ‘तुझे माझे जमेना’ म्हणणारे दाम्पत्य आता ‘तुझ्यावाचून करमेना’ म्हणत आहेत.
चारित्र्यावर संशय हेही कारण
nसेलकडे येत असलेल्या तक्रारीमध्ये चारित्र्यावर संयश घेणे यासुद्धा तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दारू पिऊन मारहाण करणे, सोशल मीडियाचा अतिवापर, व्हॉटस्ॲप चॅट पाहता येऊ नये म्हणून कोडवर्ड टाकणे यातून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतात. किमान ४० टक्क्यांच्या जवळपास पती चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतो, असे कारण नमूद आहे.
समुपदेशनातून २६४ कुटुंबांत फुलले हास्य
पती-पत्नीचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्याची तक्रार केली जाते. त्यानंतर हे प्रकरण भरोसा सेलकडे येते. जानेवारी ते नोव्हेंबर २०२१मध्ये भरोसा सेलकडे ८५१ तक्रारी आल्या. भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी स्वत: पती-पत्नीचे समुपदेशन करून २६४ कुटुंबांत हास्य फुलविले आहे. मागील वर्षी ६८ प्रकरणांत समझोते करण्यात आले होते. यंदा ही आकडेवारी वाढून २६४ कुटुंबांत समझोता करण्यात यश आले आहे.
बायकोचा जाच वाढलामहिलांच्या तक्रारींचा ओघ अधिक असला तरी निवड प्रमाणात पुरुषांच्यादेखील पत्नीविरुद्ध तक्रारी आहेत. पहिली बरी होती. आता तिचा स्वभाव बदलला असून जाच वाढल्याचे काकुळतीने म्हणणारे पत्नीपीडित आहेत.