आयुधनिर्माणी (भद्रावती) : अल्पवयीन वाहनचालक वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवून सुसाट वेगाने आपली दुचाकी वाहने रस्त्यावरुन पळवित आहे. वाहने पळवणाऱ्या या वाहन चालकांच्या चुकामुळे छोट्या- मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणारा वाहतूक पोलीस विभाग या चालकांना अभय देत आहे. आता त्यांच्या पालकांवरच कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.दैनंदिन गरजांच्या पूर्ततेकरिता नागरिकांना नेहमीच रस्त्यावरुन चालावे लागते. यात वयोवृद्ध नागरिक, बालके व महिला यांनाही अनेकदा कामानिमित्त शहरात वा बाजारपेठेत यावे लागते. रस्त्यावरुन चालतांना पाठीमागून येणारे वा समोरून जाणारे बेधुंद अल्पवयीन वाहन चालक वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे पादचाऱ्यांची त्रैधातिरपट होते. जवळून पळणाऱ्या वाहनांचा वेगच इतका असतो की, नागरिकांच्या काळजात धस्स होते. अल्पवयीन वाहनचालकांना वाहने पळवितांना दुसऱ्यांच्या जीवाचे काही देणे-घेणे नसल्याने जिल्ह्यात छोट्या-मोठ्या दुर्घटना नित्याच्याच झाल्या आहे. अनेकदा ही बालके मागे पाहतात व वाहन पुढे पळवतात. ते आपल्या अंगावर तर येऊन आपल्याला जखमी करणार नाही ना अशी भीती घराबाहेर पडणाऱ्यांवर विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना असते. अनेकवेळा दुचाकीवर तीन-चार जण बसून वाहने चालवतात. त्यात मुलींचे घोळके पाहून दोन्ही हात सोडणे, तोंडातून विशिष्ठ आवाज काढत आपल्याकडे लक्ष वेधणे, आपल्या वाहनांचा कर्णकर्कश आवाज वाढविणे असे प्रकार नित्याचेच झाले आहे. रस्त्यावरुन वळण घेताना मागच्याला सिग्नल न देता लगेच टर्न घेणे अशा कितीतरी हरकती बघायला मिळतात. या अल्पवयीन वाहकांना वाहतूक नियमांचे ज्ञान नसल्याने केवळ जोषपूर्ण गाडी पळवीत वाहतूक नियमांची ऐशीतैशी करीत आहे. सुव्यवस्था हाताळणारा पोलीस विभाग डोळे झाक करून यांना अपत्यक्ष प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अल्पवयीन वाहनधारकांची संख्या वाढली आहे. त्यांच्यावर कार्यवाही करून नागरिकांना रस्त्यावरुन सुखरूप चालण्याचे अभय पोलीस विभाग का देत नाही, असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.अल्पवयीन वाहन चालकांना दुचाकी चालवण्यास अप्रत्यक्षपणे पोलीस विभाग डोळेझाक करून जशी मदत करतो त्याच प्रकारे त्यांचे पालकही जबाबदार आहेत. त्यांनीच जर या मुला-मुलींच्या हातात गाडीच्या चाब्या दिल्या नाही तर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना टळू शकते. परंतु प्रेमापोटी पालक आपल्या पाल्याला नियम तोडण्यास लावत आहे.काहीवेळा पालक घरी नसताना बालके त्यांना माहिती होऊ न देता गाडी बाहेर काढतात. हौसेपोटी ती वेगाने पळवून कधी आपले तर कधी दुसऱ्याचे नुकसान करून बसतात. कारणे काहीही असली तरी वाहनांमुळे जे नुकसान होते त्याची भरपाई भरून निघणे शक्य नसते. घडणारे अपघात किरकोळ असल्याने केवळ बाचाबाचीवर प्रसंग निभावले जातात. परंतु कामानिमित्त बाहेर जाणारी घरची व्यक्ती सुखरूप परत येणार की, नाही ही चिंता मात्र कुटूंबियांना सतावते. वाहन चालक अल्पवयाच्या मुला-मुलींच्या पालकांना दोषी घरून कार्यवाही झाल्यास ही समस्याच मुळासकट मिटेल अशी जाणकारांची अपेक्षा आहे. जिल्ह्यात ही समस्या प्रत्येक गावात आहे. यावर वेळीच प्रतिबंधक घालणे गरजेचे आहे.डोकेदुखी ठरणार ही समस्या चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वरोरा, आदी ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. एवढेच नाही तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळते. पोलीस प्रशासनाने या वाहनधारकांना अडविल्यास काही प्रमाणात का होईना यावर आळा घालता येऊ शकतो. पोलिसांनी मोहीम सुरु करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
अल्पवयीन वाहनचालकांना पोलिसांचे अभय
By admin | Published: November 16, 2014 10:47 PM