भयभीत करणारा आवाज : वाहनचालकाची तक्रार करण्याचे आवाहन चंद्रपूर : सध्या बुलेट दुचाकी वाहनाची क्रेझ वाढली असून चंद्रपूर शहरात अनेकांनी बुलेट वाहनाद्वारे फटाक्यांचा आवाज काढून इतरांना भयभीत करीत असल्याचा प्रकार सुरू आहे. अशा १३ बुलेटराजांवर गेल्या १५ दिवसांत चंद्रपूर शहर वाहतूक शाखेने कारवाई करून प्रत्येकी एक हजार रूपये असा एकूण १३ हजार रूपयांचा दंड वसूल केला. सध्या अनेकांना बुलेट दुचाकी वाहनाची भुरळ पडली असून अनेक महाविद्यालयीन युवक बुलेट वाहन चालविताना दिसतात. मात्र या दुचाकी वाहनाला विशिष्ट प्रकारची मशीन बसवली जात असल्याने वाहन धावताना फटका फोडल्यासारखे मोठा आवाज येत असतो. या आवाजामुळे अनेक जण भयभीत होत असतात. तर आवाजाची तिव्रता जास्त राहत असल्याने लहान बालके व वयोवृद्धांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असते. या बुलेटराजांच्या अनेक तक्रारी वाहतूक शाखेकडे आल्या होत्या. याची दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून बुलेटराजांवर कारवाईचा बडगा उगारला. यात गेल्या पंधरा दिवसांत १३ जणांवर कारवाई करून १३ हजार रूपये दंड वसूल केला. तसेच मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या ८ जणांवर वाहतूक शाखेने गुन्हे नोंदविले. विशेष म्हणजे, बुलेट वाहन चालवून फटक्यासारख आवाज काढणाऱ्यांमध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यांसह सुशिक्षीत व नोकरदार वर्गाचाही समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक कोळी, श्यामसुंदर खोटेमाटे, अरूण निमगडे यांनी केली. अशाप्रकारचे वाहन चालवून आवाजाद्वारे नागरिकांना भयभीत करणाऱ्यांची माहिती वाहतूक शाखेला द्यावी, त्या चालकावर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१३ बुलेट राजांवर पोलिसांची कारवाई
By admin | Published: February 08, 2017 2:11 AM