घटनेचा निषेध : सिंदेवाहीच्या व्यावसायिकांनी पाळला बंद, कारवाई करण्याची मागणीसिंदेवाही : रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास शहरातील एका चौकात बसून असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दोन मुलांना सिंदेवाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाहीच्या व्यावसायिकांनी गुरूवारी बाजारपेठ बंद ठेवली व प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.गुरूवारच्या रात्री सिंदेवाही येथील हार्दिक सुचक व आशिष पुंडावार हे दोन युवक एका चौकात चर्चा करीत बसले होते. दरम्यान मूलचे उपविभागीय अधिकारी महामुनी, सिंदेवाहीचे पोलीस निरीक्षक एम. परघने व त्यांचे कर्मचारी पेट्रोलींग करीत होते. पोलिसांनी वाहन थांबवून त्यांना विचारपूस केली. तेव्हा दोन्ही युवक व पोलिसांत शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही युवकांना दारू पिऊन असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले व त्यांना पोलीस ठाण्यात नेले व उपविभागीय अधिकारी निघून गेले. त्यानंतर पोलीस निरीक्षक परघने व पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली, असा आरोप युवकांनी केला आहे. आज गुरूवारी ही वार्ता शहरात पसरताच व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. तर आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडून होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही. कारण नसताना ताब्यात घेऊन मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश बिसेन, राहूल पटेल, जयेश सुचक, अनिल भवानी, राजकुमार धावेजा, गणेश बोलपल्लीवार, योगेश बोरकुंडवार, हितेश सुचक आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)रात्री उशीरापर्यंत चौकात बसून असल्याने त्यांना विचारपूस केली. तेव्हा दोन्ही युवकांनी उद्धटपणे उत्तर दिले. त्यामुळे त्यांना चौकशीासाठी ताब्यात घेऊन सकाळी सोडण्यात आले. त्यांना कोणत्याही प्रकारची मारहाण केली नसून त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत.- एम. परघने , पोलीस निरीक्षक, सिंदेवाही.
पोलिसांकडून व्यापाऱ्यांच्या मुलास मारहाण
By admin | Published: September 25, 2015 1:28 AM