परिमल डोहणे
चंद्रपूर : आत्महत्या करणाऱ्यासाठी नदीत उडी घेतानाच चक्क धावती दुचाकी तशीच फेकून पोलिस शिपायाने एका मुलीचे प्राण वाचविल्याची सिनेस्टाइल घटना शुक्रवारी सायंकाळी वर्धा नदी पुलावर घडली. भगवान पंढरी मुंडे असे त्या जिगरबाज पोलिस शिपायाचे नाव आहे. भगवान त्या मुलीसाठी भगवान ठरला असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे. सध्या ती मुलगी सुस्थितीत असल्याची माहिती आहे.
भगवान पंढरी मुंडे हे विरूर पोलिस स्टेशनमध्ये पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी पोलिस शिपायाची बदली प्रक्रिया असल्याने ते चंद्रपूर पोलिस मुख्यालयाला आले होते. दिवसभर बदली प्रक्रिया आटोपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने गावाला जायला निघाला. वर्धा नदीपुलावर आल्यानंतर एक मुलगी ऑटोतून पुलावर उतरल्याचे त्याच्या लक्षात आले. पुलावर एकटीच मुलगी कशाला उतरली, यांना संशय आला. त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला.
दरम्यान, ती मुलगी पुलावरून उडी मारण्यासाठी जात असल्याचे लक्षात येताच त्यानी आपली दुचाकी तशीच सोडून त्या मुलीकडे धाव घेतली. ती मुलगी नदीत उडी टाकणारच यावेळी त्यानी तिची टी-शर्ट पकडली. दरम्यान, त्याच मार्गावरून जाणाऱ्या दोघांना त्याने मदतीला बोलवून तिला सुखरूप बाहेर काढले. भगवान मुंडे यांच्या समयसुचकतेमुळे त्या मुलीचे प्राण वाचले. त्यांनी तिची विचारपूस करून तिची समजूत काढून बल्लारपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंडे यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ट्रेनमधून पडलेल्या मुलाचेही वाचवले होते प्राण
मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी ट्रेनमधून पडलेल्या अशाच एका मुलाला भगवान पंढरी याने वाचविले होते. आता पुन्हा एका आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव वाचवला आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी भगवान मुंडे यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.