भद्रावती येथील घटना : आईबद्दल आपत्तीजनक वक्तव्यभद्रावती : सहायक उपनिरीक्षकांनी एका विधवा महिलेच्या मुलास त्याच्या आईविषयी आपत्तीजनक वक्तव्य केल्याने चिडून जावून त्या मुलाने पोलीस स्टेशनच्या समोरच सहायक उपनिरीक्षकाची यथेच्छ धुलाई केली. याप्रकरणी ठाणेदारांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. मात्र या घटनेची चर्चा दिवसभर शहरातील नागरिक करीत होते.येथील पोलीस स्टेशनमधील सहायक उपनिरीक्षक सुरेश आखाडे यांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता पोलीस स्टेशन परिसरात भाजी विक्री करणाऱ्या एका विधवा महिलेचा मुलगा वैभव भेले याच्याशी मोटरसायकलवरून वाद घातला. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक आखाडे यांनी त्या युवकाच्या आईबद्दल आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे चिडून वैभव भेले याने ‘माझ्या आईबद्दल तुम्ही असे घृणास्पद शब्द वापरू नका’, असे समजावून सांगितले. परंतु आखाडे तशाच शब्दात त्याला शिवीगाळ करीत राहिले. आखाडे पोलीस अधिकारी असल्याचा आपला रुबाब दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी संयम सुटल्याने वैभव याने आखाडे या पोलीस अधिकाऱ्यास यथेच्छ चोपून काढले. हा प्रकार सुरू असताना आजूबाजूचे दुकानदार आणि नागरिकांनी गर्दी केली. या वादात मध्यस्थी करीत नागरिकांनी दोघांचीही समजूत घातली. परंतु दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर हा वाद पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्यानंतर ठाणेदारांनी दोघांचीही समजूत घालून हे प्रकरण मिटविले. या पोलीस अधिकाऱ्याच्या अशा प्रकारच्या अनेक तक्रारीची पोलीस कर्मचाऱ्यांना व परिसरातील व्यापाऱ्यांना माहिती आहे. या घटनेदरम्यान ते यापूर्वीच्या त्यांच्या घटनांची चर्चा करीत होते. (शहर प्रतिनिधी)
पोलीस अधिकाऱ्यास युवकाने दिला चोप
By admin | Published: January 17, 2017 12:26 AM