सावली : तालुक्यातील व्याहाड बुज. येथील दोन अवैध दारू विक्रेत्यांना सावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ३० हजाराची अवैध देशी दारू जप्त करुन विक्रेत्यांना अटक करण्यात आली. १ एप्रिलपासून जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची यंत्रणा दारूच्या बाबतीत सतर्क झाली आहे. सावली पोलिसांच्या कार्यवाहीत व्याहाड बुज. येथील गोविंदा गोमा गेडाम याच्याकडून आठ पेट्या देशी दारू व आनंदराव राजेश्वर कोसरे यांच्याकडून चार पेट्या व ३६ निपा दारू पोलिसांनी पकडून दोघांनाही ताब्यात घेतले. यातील प्रमुख आरोपी मनोहर भोयर फरार आहे. सदर आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत २९ हजार ९०० रुपये आहे. ही कार्यवाही सहाय्यक ठाणेदार प्रमोद बानबले, सी.टी. म्हसके, सहाय्यक फौजदार मधुकर भाकरे, पो.हवा. रमेश झाडे, शिपाई सचिन सायंकार, अजय गिरडकर, अनुप कवठेकर यांनी केली. गडचांदुरात दारू पकडलीगडचांदूर : गडचांदूर येथील वॉर्ड नं. चार मध्ये अंमलनाला रस्त्यावरील एकाच्या घरी धाड टाकून ४३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व पती-पत्नीला अटक केली. ज्ञानेश्वर भोंगळे (४०) व मनिषा भोंगळे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. दारूसाठा असल्याची गुप्त माहिती गडचांदूरचे पोलीस निरीक्षक दीपक वंजारी यांना मिळाली. त्यांनी दुपारी १२ वाजता पोलीस ताफ्यासह ज्ञानेश्वर भोगळे याच्या घरी धाड टाकली. झडती घेतली असता, मोठ्या प्रमाणात दारू साठा आढळून आला. घरामधील दोन फ्रिजमध्ये, मोटर सायकलच्या डिकीमध्ये, साऊंड बाक्समध्ये, धान्याच्या कोठीमध्ये तसेच घरातील खोलीमध्ये तीन खड्डे करुन दारुच्या बॉटल लपवून ठेवल्या होत्या. सर्व दारू जप्त करून मनिषा भोगळे या महिलेला व तिच्या पतीला अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. (वार्ताहर)भद्रावती तालुक्यात ७० हजारांची अवैध दारू जप्तभद्रावती : भद्रावती पोलिसांनी वेगवेगळ्या तीन ठिकाणी टाकलेल्या धाडीत अवैध दारू विक्रेत्यांकडून ७० हजाराची अवैध दारू जप्त केली. यात चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुधोली येथे अवैध दारू विक्री करीत असताना रमेश बिडवाईक (४५) राम मास्यी कोहचाळा (४१) याच्याकडून १२ हजाराची मोहफुलाची दारू तर रवी हरिदास पाटील (३०), रविंद्र ईस्तवत (४०) यांचेकडून ३७ हजारांची मोहफुलाची दारू तर भद्रावती येथे टाकलेल्या धाडीत मोंदू मयूर रामटेके (३२) याच्याकडून १२ हजाराची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाही ठाणेदार अशोक साखरकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तीन दिवसाच्या धाड सत्रात दोन लाख दारू जप्त करण्यात आली.
दारू विक्रेत्यांच्या घरी पोलिसांच्या धाडी
By admin | Published: April 04, 2015 12:31 AM