चंद्रपूर : महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा असतानाही जिल्ह्यातील वणी खुर्द, मिंडाळा (टोली), मोहाळी (मोकासा) आणि चंद्रपुरातील भिवापूर वॉर्डात करणी, जादूटोणा, भानामती करतो म्हणून कुटुंबीयांना मारहाणीच्या घटना घडल्या. या घटना यापुढे घडू नयेत, याकरिता पोलीस पाटलांनी जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती गावागावात पोहोचवावी, असे आवाहन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी पोलीस ठाणे, शेगाव (बुज.) येथील अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी केले.
अध्यक्षस्थानी पोलीस स्टेशन शेगाव (बुज.) चे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम, तर प्रमुख अतिथी अ.भा. अंनिसचे जिल्हा सहसचिव अनिल लोनबले, पीएसआय महादेव सरोदे, शांतता कमिटीचे अध्यक्ष मनोज बोनगुलवार, पोलीस पाटील समितीचे अध्यक्ष शांताराम कुंभारे उपस्थित होते. प्रा. श्याम मानव यांनी स्थापन केलेली ही समिती समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याचे काम सातत्याने करीत असल्याचे लोनबले यांनी सांगितले. जादूटोणा, मंत्र-तंत्र, भानामतीच्या नावाखाली कोणाचाही जीव जाऊ नये, नरबळीसारख्या घटना घडू नयेत याकरिता आपण सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाथोडे यांनी केले.
चूत्रसंचालन व प्रास्ताविक पोलीस पाटील संघटना सदस्य दीपक निब्रट यांनी केले, तर पीएसआय सरोदे यांनी आभार मानले. आयोजनासाठी पोलीस पाटील, शांतता समितीचे सदस्य, पोलीस सहायक व होमगार्ड आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.