चिमूर : सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, त्यांनी आपल्या सहकाऱ्यासह माणूसमारी जंगलात जाऊन धाड टाकून मोहफुल दारू विक्रेते सुभाष वाघमारे, आशिष शंभरकर यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला, तर दुसऱ्या कारवाईत सचिन बाबूलकर, आकाश मेश्राम रा.चिमूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात मंगळवारी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना, सुभाष वाघमारे व आशिष शंभरकर दोन्ही रा. कवडशी हे माणूसमारी जंगल परिसरात हातभट्टीवर मोहा दारू काढत आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली असता, पोलिसांनी तिथे धाड टाकली. सुभाष वाघमारे व आशिष शंभरकर हे पोलिसांची चाहूल लागताच जंगलाच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूसह दोन लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई सोनेगाव जंगल परिसरात करण्यात आली. यात २ लाख ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सचिन बाबुलकर व आकाश मेश्राम यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे, प्रवीण गोन्नाडे, कैलाश आलाम, विलास निंमगडे, सचिन गजभिये, सचिन खामनकर आदींनी केली.