चंद्रपूर : मागील तीन ते चार दिवसांपासून चंद्रपूर पोलिसांचे आयपीएल सट्टेबाजांवर धाडसत्र सुरू आहे. सलग दोन दिवस स्थानिक गुन्हे शाखेने आयपीएल सट्टेबाजांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता चंद्रपूर शहर व पडोली पोलिसांनीही शनिवारी आयपीएल सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांच्या कारवाईत सय्यद इम्रान अली (३६, शिवाजीनगर, चंद्रपूर) याला अटक केली असून, सुमित जांगीड हा फरार आहे. या कारवाईत ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर पडोली येथील कारवाई गुड्डू ऊर्फ गुरुमुख आहुजा (४०, रा. रामनगर, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले आहे, तर विजय आहुजा हा फरार आहे. या कारवाईत १३ हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सय्यद इम्रान अली हा कस्तुरबा रोड, छोटी मस्जीदजवळ आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी पंचासमक्ष धाड टाकून मोबाइल व नगदी दोन हजार ४०० रुपये असा एकूण ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या मोबाइलची पाहणी केली असता तो विशेष आयडी मिळून आली. आयडी कुठून बनवली, अशी माहिती विचारली असता, सुमित जांगीड याने तयार करून दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोघांवरही महाराष्ट्र जुगार कायदा व सहकलम १०९ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद केली. पोलिसांनी सय्यद इम्रान अली याला अटक केली तर सुमित जांगीड हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख एपीआय मंगेश भोंगाडे व त्यांच्या पथकांनी केली.
पडोलीत एकाला अटक
पडोली पोलिसांची चमू गस्त घालत असताना लक्ष्मी मोबाइल शॉपसमोर आयपीएल सट्ट्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर धाड टाकली असता, गुड्डू ऊर्फ गुरुमुखदास अहुजा आढळून आला. त्याची तपासणी केली असता मोबाइलसह जुगाराचे साहित्य असा एकूण किमान १३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी त्याची विचारणा केली असता, विजय आहुजा याच्यासुद्धा समावेश असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांवरही कलम महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ सह १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. गुड्डू ऊर्फ गुरुमुखदास आहुजा याला अटक केली असून, विजय आहुजा हा फरार आहे. ही कारवाई ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात पडोली पोलिसांनी केली.
नांदगावात सहाजणांना अटक
चंद्रपूर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना नांदगाव पोडे येथे कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पंचासमक्ष त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी निखिल रामचंद्र नदीवे (३०, रा. बल्लारपूर), गोविंदा गोपालराव झोडे (३५, रा. भानापेठ, चंद्रपूर), प्रकाश रमेश भोयर (३५, रा. गंजवार्ड, चंद्रपूर), मनोज नानाजी पोडे (३५), सचिन लक्ष्मण आतराम (२९), आनंदराव गणपती भोयर (६३, तिघेही रा. नांदगाव पोडे) आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती केली असता दोन हजार ८५० रुपये, दोन कोंबडे, दोन लोखंडी कात्या असा एकूण तीन हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे व त्यांच्या पथकांनी केली आहे.