मूल : सावली येथून दोन आयशर ट्रकमध्ये ६१ जनावरांना कोंबून चांदापूर, फिस्कुटीमार्गे गडचांदूरकडे नेताना मूल पोलिसांनी ट्रक अडवून सोमवारी रात्री जनावरांची सुटका केली. जनावरांच्या संरक्षणासाठी त्यांना गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळा व सेवा संस्था येथे ठेवण्यात आले आहे.
सावली तालुक्यातून दोन आयशर ट्रकमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मूल पोलिसांना मिळाली. ट्रकमधील जनावरांची वाहतूक करताना कोणतीही अडचणी भासू नये, यासाठी एका लाल रंगाच्या चारचाकी वाहनाचा आधारही घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्याआधारे मूल पोलिसांनी फिस्कुटीजवळ नाकाबंदी केली. दरम्यान, लाल रंगाची मारुती सुझुकी (क्र. एमएच ०१ बी एफ १५९०) हे चारचाकी वाहन समोर येताच वाहन थांबवून वाहनचालक अब्दुल जुबेर अब्दुल रशीद (३२, रा. गडचांदूर) याची चौकशी करीत असताना दोन ट्रक येत असल्याचे दिसून आले. परंतु पोलिसांना पाहून ट्रकचालक अंधाराचा फायदा घेत ट्रक बंद करून पळून गेले. यावेळी आयशर ट्रकची चौकशी केली असता, त्याठिकाणी जनावरे आढळून आली. याप्रकरणी आयशर ट्रक (क्र. एमएच ३४ बिजी १८१३) यामध्ये २५ गाई व ६ बैल, तर आयशर ट्रक (एमएच ३४-बिजी ८७१४) मध्ये २५ गाई आणि ६ बैल आढळून आले. दोन्ही ट्रकमधील ६१ जनावरांना गोंडपिपरी येथील श्रीकृष्ण गोशाळा व सेवा संस्था येथे ठेवण्यात आले आहे. ६१ गोवंशीय जनावरांची किंमत ६ लाख १० हजार रुपये असून, ट्रकची किंमत २२ लाख, सुरक्षेसाठी वापरलेली चारचाकी वाहनाची ५ लाख, आरोपीचा मोबाईल १० हजार असा एकूण ३३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी केली. आरोपीविरुद्ध कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सह कलम ११(१) (ड) प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.