चंद्रपुरातील घटना : म्हशी चारण्यासाठी गेलेला इसम अडकला पुरात चंद्रपूर : तीन-चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लहान-मोठे नदी, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. नद्यांची पातळी वाढत असल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस प्रशासन व आपातकालीन बचाव पथक हे दिवस-रात्र तात्काळ मदतीसाठी कार्य करीत आहेत. एक इसम पुराच्या पाण्यात अडकून असल्याची माहिती शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याला मिळाली. बिनबा गेट ते चौराळा इरई नदी पूल ते हनुमान मंदिर या भागात पावसामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे त्या भागात म्हशी चारण्यासाठी घेवून गेलेले शालीक रघुनाथ टेकाम (५०) हे पाण्याने वेढलेले होते. त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते मदतीसाठी अडकून आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक अतुल दौड यांनी आपल्या पोलीस चमूसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली व घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ताजने यांना दिली. पोलीस निरीक्षक ताजणे यांनी वरिष्ठांना माहिती देवून नियंत्रण कक्ष येथे तातडीने संपर्क केला व आपातकालीन बचाव पथकाशी संपर्क करून त्या इसमास बचावाकरिता तात्काळ मोटारबोटसह घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी हजर असलेल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या चमूने व आपातकालीन बचाव पथकाने पाण्याने वेढलेल्या शालीक रघुनाथ टेकाम यांना सुरक्षितरित्या बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले. इसमाला वाचविण्यासाठी पोलीस विभागाकडून तातडीने झालेल्या कारवाईबाबत स्थानिक नागरिक व शालिक टेकाम यांच्या नोतवाईकांनी पोलीस विभागाचे आभार मानले आहे. आपातकालीन सेवेसाठी सर्व विभाग तत्पर झाले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
पोलिसांनी वाचविले पुरात अडकलेल्या इसमाचे प्राण
By admin | Published: July 13, 2016 1:54 AM