ब्रह्मपुरी : एक युवक आपल्या दुचाकीने स्वगावी जात असताना रस्त्यावरून दुचाकी घसरल्याने युवक जखमी झाला. अपघातानंतर तो तिथेच पडून होता. योगायोगाने पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी जखमी युवकाला रुग्णवाहिकेची वाट न बघता आपल्या शासकीय चारचाकी वाहनातून थेट रुग्णालयात पोहोचवत त्या जखमी युवकाचे प्राण वाचविले.
नागभीड तालुक्यातील पांजरेपार येथील आशिष रामटेके (२४) हा आरमोरी येथे काही कामानिमित्ताने गेला होता. आपले काम आटोपून १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान आपल्या स्वगावी जात असताना ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील बेटाळा फाट्याजवळ युवकाची दुचाकी रस्त्यावरून घसरल्याने युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्यानंतर रस्त्याने जात असलेले नागरिक घटनास्थळी जखमीला बघत होते; मात्र कुणीही जखमीला रुग्णालयात दाखल करण्याची माणुसकी दाखवली नाही. तेवढ्यातच गस्तीवर असलेले ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलीस अंमलदार प्रकाश दुपारे हे त्या रस्त्यावरून जात असताना नागरिकांचा जमाव दिसल्याने त्या ठिकाणी थांबले. जखमीच्या डोक्याला आधी रुमाल बांधला व रुग्णवाहिकेची वाट न बघता समयसूचकता व घटनेचे गांभीर्य बघून पोलीस विभागाच्या शासकीय वाहनात युवकाला बसवून थेट ग्रामीण रुग्णालय गाठले व युवकाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर युवकाच्या नातेवाइकांसोबत संपर्क साधून त्यांना घटनेविषयी माहिती दिली. सध्या युवकाची प्रकृती स्थिर आहे.