नागभीड तालुक्यातील पांजरेपार येथील आशिष रामटेके (२४) हा आरमोरी येथे काही कामानिमित्ताने गेला होता. आपले काम आटोपून १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान आपल्या स्वगावी जात असताना ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील बेटाळा फाट्याजवळ युवकाची दुचाकी रस्त्यावरून घसरल्याने युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्यानंतर रस्त्याने जात असलेले नागरिक घटनास्थळी जखमीला बघत होते; मात्र कुणीही जखमीला रुग्णालयात दाखल करण्याची माणुसकी दाखवली नाही. तेवढ्यातच गस्तीवर असलेले ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोलीस अंमलदार प्रकाश दुपारे हे त्या रस्त्यावरून जात असताना नागरिकांचा जमाव दिसल्याने त्या ठिकाणी थांबले. जखमीच्या डोक्याला आधी रुमाल बांधला व रुग्णवाहिकेची वाट न बघता समयसूचकता व घटनेचे गांभीर्य बघून पोलीस विभागाच्या शासकीय वाहनात युवकाला बसवून थेट ग्रामीण रुग्णालय गाठले व युवकाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर युवकाच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधून त्यांना घटनेविषयी माहिती दिली. सध्या युवकाची प्रकृती स्थिर आहे.
150921\img-20210915-wa0074.jpg
याच गाडीतून रुग्णालयात नेणारे पोलीस अधिकारी