ब्रह्मपुरी : पोवनपार येथील रहिवासी असलेली श्रुतिका बंडू चौधरी (१३) हिला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती सदर चिमुकलीला ए निगेटिव्ह रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु रक्तगट मिळू शकला नाही. सदर चिमुकलीला रक्ताची नितांत गरज असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यानंतर एका पोलीस शिपायाचा ए निगेटिव्ह रक्तगट असल्याने त्यांना विनंती करण्यात आली. त्यांनी तात्काळ रक्तदान करून चिमुकलीचे प्राण वाचविले.
श्रुतिकाला रक्ताची गरज असल्याने तालुक्यातील रक्त पुरवठा करणाऱ्या संस्था, संघटना यांनी सदर गटाचे रक्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तरीसुद्धा ए निगेटिव्ह रक्तगट मिळाले नाही.
यावेळी पारडगाव येथील रक्तपेढी चालविणारा मंगल पारधी यांनी हा रक्तगट कोणाचा आहे, हे शोधून त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना शहरातील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका चिमुकल्या मुलीला आपला रक्तगट असलेल्या रक्ताची नितांत गरज असल्याचे सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस शिपाई सचिन बारसागडे वडसा मार्गावरील चिंचोली (बुज) याठिकाणी कर्तव्यावर उपस्थित असतानासुद्धा तात्काळ ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल होऊन रक्त दिले आणि परत आपल्या कर्तव्यावर रुजू झाले. बारसागडे यांनी तात्काळ आपले रक्त देऊन एका चिमुकल्या मुलीला जीवनदान दिले.