विनायक येसेकर
भद्रावती : औद्योगिक भद्रावती तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायाचा आलेख वाढताना दिसत आहे. मात्र यावर वचक असणारे पोलीस प्रशासन पाहिजे तसे अंकुश आणण्यास असमर्थ ठरत असल्याचे गेल्या चार वर्षांच्या काळात दिसून आले आहे. चार वर्षाच्या काळात भद्रावती ठाण्यात सहा ठाणेदारांनी निरनिराळ्या पद्धतीने कार्य बजावले. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे म्हणावे की ठाणेदाराच्या झटपट होणाऱ्या बदल्यांमुळे की अन्य काही कारणांमुळे गुन्हेगारीवर अद्याप वचक बसलेला दिसत नाही.
इतिहासकालीन भद्रावती नगरी स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वेची वाहतूक चालू झाल्यापासून या शहरात पोलीस स्टेशन कार्यरत आहे. शहराचे रूपांतर तालुक्यात झाले. त्यातच आज औद्योगिक तालुका म्हणून भद्रावतीची ओळख आहे. या औद्योगिकरणामुळे शहरासह खेड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ झाली आहे. तालुक्यात माजरी पोलीस स्टेशन वगळले तर घोडपेठ, चंदनखेडा यासारखे मोठमोठे तब्बल ७२ खेडे हे भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येतात. शहरासह या खेळातील लोकसंख्येच्या तुलनेने ७२ पोलिसांवर व पाच कर्मचाऱ्यांवर या पोलीस स्टेशन हद्दीचा कारभार आहे. स्मार्ट पोलीस स्टेशन होऊनही या चार वर्षांच्या काळात इतर गुन्ह्यांसह अत्याचाराचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जिल्ह्यात दारूबंदी हटताच अवैध दारू विक्री कमी झाली असली तरी चोरीच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
बॉक्स
अवैध वाहतूक
औद्योगिक तालुका असल्याने या क्षेत्रात वेकोली, कर्नाटक एम्टा तसेच इतर खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये चालणारी जड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच ट्रॅक्टरसह मोठमोठ्या वाहनांनी अवैध रेती वाहतूक केली जाते. या ट्रॅक्टरवर वनविभागाची नजर असली तरी याकडे महसूल व पोलीस विभागाने पूर्णपणे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.
बॉक्स
युवावर्गाची स्टंटबाजी
शहरात सध्या बेधुंद मोटारसायकल चालवणाऱ्या युवा स्टंटबाजांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. मागील वर्षी या स्टंटबाजीमुळे एकाचा जीवसुद्धा गेला होता. अशा या बेलगाम स्टंटबाजांवर पोलिसांनी अंकुश लावणे गरजेचे आहे.
कोट
भद्रावती क्षेत्रात २०११ मध्ये कार्य केलेले आहे. हे शहर माझ्यासाठी नवे नाही. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता पूर्ण वेळ काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच गुन्हेगारीवर अंकुश आणू तसेच स्टंटबाजीसारखे विषय प्रत्यक्ष हाताळण्याचा प्रयत्न करीन.
- गोपाल भारती, ठाणेदार, भद्रावती