लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शहरी भागात २४ हजार २२४, मनपा ३५ हजार ६५७ व ग्रामीण भागात १ लाख ८९ हजार ३४ अशा एकूण १ लाख ६८ हजार ८१५ बालकांना पोलिओ आरोग्य विभागाच्या वतीने पोलिओ लस देण्यात आली. घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोहिमेदरम्यान पोलिओ लस देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी मेश्राम, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत, डॉ. परमेश्वर वाकतकर उपस्थित होते. घुग्घुस, ताडाळी, दूर्गापूर येथील पोलिओ बुथवर भेट देऊन डॉ. गहलोत यांनी मार्गदर्शन केले. मोहिमेसाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती गठित झाली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली. गुरूवारपर्यंत आयपीपीआय अंतर्गत कर्मचारी घरोघरी जाऊन बालकांना पोलिओ लस दिल्या जाणार आहे.
१ लाख ६८ हजार ८१५ बालकांना पोलिओ लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:24 PM