चंद्रपूर : येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहे. या निधीतून विविध विकासकामे केली जाणार आहेत. मात्र, हा निधी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच आल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. तर, आमदार किशोर जोरगेवार यांनीही आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधी मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमका निधी कुणाच्या पाठपुराव्यामुळे आला, यावरून आता वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ३१ मार्च २०२२ रोजीच्या शासननिर्णयान्वये ५० लक्ष रु. निधी मंजूर करण्यात आला आल्याचे म्हटले आहे. अर्थमंत्री असताना २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामधून आकर्षक भवन बांधण्यात आले. दरम्यान, वॉटरकुलर, ए.सी. सोलार सिस्टीम तथा साऊंड सिस्टीम बसविण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. नुकत्याच संपन्न झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान १४ मार्च २०२२ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्नसुद्धा उपस्थित केला. अधिवेशन संपताच काही दिवसांतच ५० लक्ष रू. निधी मंजूर करून घेतल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर दिलेला ‘शब्द’ पूर्ण केल्याचा दावाही मुनगंटीवार यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी आपण नागपूर दीक्षाभुमीच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दीक्षाभूमीचा विकास व्हावा याकरिता निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अधिवेशनात सातत्याने मागणी लावून धरल्यामुळेच दलित वस्ती सुधार निधीअंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहे. आपल्याच पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याचे म्हटले आहे.